...अन्‌ लोकप्रतिनिधी खडकन जागे झाले!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची सहावी निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या प्रभागातील जास्तीत कामांचे उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न पालिका सदस्यांकडून सुरू आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शहरात भूमिपूजनांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नवी मुंबई : एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची सहावी निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या प्रभागातील जास्तीत कामांचे उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न पालिका सदस्यांकडून सुरू आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शहरात भूमिपूजनांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? कोट्यवधी रुपये पाण्यात! चहूबाजूंनी रहिवाशी इमारती..

आगामी पालिका निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धत रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर नगरसेवकांनी विविध कामांना सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत ठरावीक कामांचेच उद्‌घाटन सदस्यांकडून करण्यात आले; मात्र आता निवडणूक जवळ आल्याने प्रभागातील छोट्या कामांचाही भूमिपूजन सोहळा आटोपला जात आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांना निमंत्रित केले जात आहे. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, मतदारराजाला मानसन्मान दिला जात आहे. शहरात विविध पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, अनेक प्रभागांमध्ये सध्या सोहळ्यांचे चित्र पाहायला मिळत आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर या भूमिपूजन सोहळ्यांना आणखी गती येण्याची शक्‍यता आहे. 

ही बातमी वाचली का? मॉलमधील अनधिकृत दुकानांवर हातोडा

याशिवाय अनेकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रभागातील नागरिकांना देवदर्शन वारी काढण्यास सुरुवात केली आहे. पालिकेकडून प्रभागांचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत आरक्षण सोडत जाहीर होईल. त्यामुळे उरलेल्या दिवसांत आचारसंहितेपूर्वी विविध कामांची सुरुवात केली जाईल. याच वेळी अनेक कामांची उद्‌घाटनेही केली जातील, असे एकूण चित्र शहरात विविध ठिकाणी आहे. स्वत:च्या प्रभागातील कामांची छाप मतदारांवर टाकण्यासाठी, येत्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकप्रतिनिधींकडून; तसेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांकडून होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी क्रिकेटचे सामने, काहींनी कबड्डीचे सामने भरविले आहेत; तर काही ठिकाणी कीर्तनासह अन्य महोत्सव भरविण्यात येत आहेत. 

ही बातमी वाचली का? 'या' जाचातून डॉक्टरांची सुटका

आघाडीकडेही लक्ष 
नवी मुंबई महापालिकेत एकूण 111 प्रभाग असून, त्यामधील सध्या 55 पुरुष नगरसेवक; तर 56 महिला नगरसेविका आहेत. तीच संख्या आगामी निवडणुकीत राहणार आहे. पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक असण्याची शक्‍यता आहे. असे असताना महाविकास आघाडी होणार का? त्यामुळे कोणाला किती फायदा होणार? अशी गणिते आखली जात असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भूमिपूजनांचे सोहळे रंगू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhumipoojans for navi mumbai municipal election 2020!