मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्याला मदत

ब्रह्मदेव चट्टे
रविवार, 16 एप्रिल 2017

मंत्रालयात न्याय मिळण्याऐवजी जबर मारहाण झालेले औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी रामेश्‍वर हरिभाऊ भुसारे यांना समाजातील दानशूर नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. "ई-सकाळ'द्वारे भुसारे यांना मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. दानशुरांनी भुसारे यांच्या खात्यावर आतापर्यंत 95 हजार रुपये जमा केले आहेत. पुणे येथील तेज ऍग्रो इंडिया कंपनीने "ई-सकाळ'च्या आवाहनाला प्रतिसाद देत "ना नफा, ना तोटा' तत्त्वावर भुसारे यांना शेडनेट उभारून दिले आहे.

मुंबई - मंत्रालयात न्याय मिळण्याऐवजी जबर मारहाण झालेले औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी रामेश्‍वर हरिभाऊ भुसारे यांना समाजातील दानशूर नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. "ई-सकाळ'द्वारे भुसारे यांना मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. दानशुरांनी भुसारे यांच्या खात्यावर आतापर्यंत 95 हजार रुपये जमा केले आहेत. पुणे येथील तेज ऍग्रो इंडिया कंपनीने "ई-सकाळ'च्या आवाहनाला प्रतिसाद देत "ना नफा, ना तोटा' तत्त्वावर भुसारे यांना शेडनेट उभारून दिले आहे.

"सकाळ माध्यम समूहा'ने भुसारे यांची परिस्थिती जगासमोर मांडली. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. भुसारेंना न्याय मिळावा, यासाठी घाटशेंद्रा ग्रामस्थांनी पाडवा साजरा न करता काळा दिवस पाळत "गाव बंद' आंदोलन केले होते. भुसारे या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतात जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वतःचे पैसे आणि मित्रांकडील 10 लाख खर्च केले होते. 11 एप्रिल 2015 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेले वादळी वारे व गारपिटीने त्यांचे शेडनेट पिकासहित आडवे झाले. शेडनेट पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी भुसारे दोन वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. त्यासाठीच भुसारे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते; मात्र त्यांना जबर मारहाण करून त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.

'सकाळ माध्यम समूह' माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पडलेले शेडनेट उभे राहिले. मी मला मदत केलेल्या प्रत्येकाचे व "सकाळ'चे आभार मानतो. सरकारने माझ्यावर गुन्हा नोंदवलेला असून, तो कायम आहे. त्यामुळे सरकारलाही मी विनंती करतो की मला न्याय द्यावा.
- रामेश्‍वर भुसारे, पीडित शेतकरी, घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

आमच्या कंपनीला या शेतकऱ्याला मदत करावीशी वाटली. "सकाळ'मध्ये बातमी वाचल्यानंतर आम्ही त्याच्या घरी जाऊन खात्री केली. त्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही शेडनेट उभारण्यास मदत केली.
- तेजोमय घाडगे, संचालक, तेज ऍग्रो इंडिया प्रा. लि.

Web Title: Bhusare get help from eSakal readers