कालावली ओढ्याजवळ बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्‍थ भयभीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

गेले तीन दिवस पोलादपूर तालुक्‍यातील धारवली ते कालावली मार्गावर ओढ्याजवळ बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, ठसे आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलादपूर (बातमीदार) : वनसंपदाचे ऱ्हास होत असताना जंगलाची संख्या कमी होत आहे आणि सिमेंटची वाढती जंगले वन्यजीव प्राण्यांसह पक्ष्यांच्या जीवावर बेतली जाणारी ठरत आहेत. गेले तीन दिवस पोलादपूर तालुक्‍यातील धारवली ते कालावली मार्गावर ओढ्याजवळ बिबट्याचे दर्शन होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, ठसे आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे भुकेच्या व्याकुळतेने बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना यापूर्वी उजेडात आल्या आहेत. त्यातच अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर होत असते. मात्र, कुठेतरी जंगल वाचवण्याचे प्रयत्न कमी पडत आहेत. पोलादपूर तालुका दुर्गम डोंगर भाग असून, या डोंगरदऱ्यामध्ये वन्यजीव प्राणी आढळून येतात. यामध्ये तरस, रानडुकरे याची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, यापूर्वी बिबट्या अथवा वाघ यांनी हल्ला केल्याच्या घटना आढळून आल्या नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून धारवली ते कालावली मार्गावर ओढ्याजवळ बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गावातील रहिवासी कुमार जैतपाल यांच्या घराजवळ बिबट्या येत असल्याचे सांगण्यात आले.

हा बिबट्या ५ फूट उंच आणि सुमारे पाच ते सहा फूट लांब आहे. बिबट्या गेले तीन दिवस दिसत असल्याची माहिती श्री द्वारकानाथ पवार यांनी आणि काही गावकऱ्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे हा बिबट्या भरदुपारी रस्त्यात उभा असतो. याबाबत ग्रामस्थांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे; तसेच वन विभागाला कळवले होते. वन विभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करत ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी बिबट्या दिसल्यास फटाके उडवा, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पुन्हा रात्री पाहणी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

आम्‍ही गावात पाहणी केली; मात्र कोठेही पायाचे ठसे आढळून आले नाहीत. पुन्हा रात्रीच्या वेळेस पाहणी करणार आहोत. ठसे आढळून आल्यास बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येईल. 
- गुजर रावसाहेब, वन अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bibatya news