गड्या आपली सायकलच बरी; रायगडमध्ये विक्रीत 15 टक्‍क्‍यांनी वाढ

महेंद्र दुसार
Thursday, 22 October 2020

लॉकडाऊनमध्ये दुचाकी वापरण्यास पोलिसांनी मनाई केल्यानंतर अनेकांना अडगळीत पडलेल्या सायकलीची आठवण झाली. त्यानंतर शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी नियमित व्यायामाकडे लक्ष देण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सायकल चालवण्याचा कल वाढला आहे. 

अलिबाग : कोरोनामुळे सर्वांचीच लाईफस्टाईल बदलून गेली आहे. आरोग्याची काळजी आणि पैशाच्या काटकसरीसाठी अनेक पर्याय निवडले जात असून, आता दळणवळणासाठी स्वस्त आणि मस्त अशा सायकलच्या पर्यायाचा वापर वाढू लागला आहे. लॉकडाऊनपूर्वी ज्या प्रमाणात विक्री होत असे, त्यामध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. सायकलची क्रेझ वाढत असून, दसरा-दिवाळीनिमित्ताने खरेदीसाठी विचारपूस केली जात आहे. 

एकनाथ खडसेंचे पुनर्वसन कसे करणार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिले प्रत्युत्तर

लॉकडाऊनमध्ये दुचाकी वापरण्यास पोलिसांनी मनाई केल्यानंतर अनेकांना अडगळीत पडलेल्या सायकलीची आठवण झाली. त्यानंतर शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी नियमित व्यायामाकडे लक्ष देण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सायकल चालवण्याचा कल वाढला आहे. सध्या बाजारात भाजी, किराणा साहित्य आणण्यासाठी पूर्वी दुचाकी वाहनांचा वापर नागरिक करताना दिसत होते. आता शहरात पहाटे विविध रस्त्यांवर सायकलीने रपेट मारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर पूर्वी सकाळ-संध्याकाळ पायी रपेट मारण्यासाठी अनेक जण येत असत. आता सायकलवरून रपेट मारताना अनेक जण दिसतात. 

किमतींमध्ये वाढ 
सायकलींसाठी चिनी बनावटीच्या कमी किमतीतील वस्तू पूर्वी येत असत. अलीकडे चिनी वस्तू येणे बंद झाले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या बंद होत्या. त्यामुळे सुट्या भागांचा बाजारात तुटवडा जाणवत आहे. यामुळे किमतीत 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे. 

स्पोर्टस्‌ सायकलींना मागणी 
सायकली लांबच्या प्रवासासाठी खरेदी न करता व्यायामासाठी जास्त खरेदी केल्या जातात. लहान मुलांबरोबरच मध्यम वयाचे पुरुष मंडळी या सायकली जास्त वापरताना दिसतात. यामुळे सायकलीचा लूक स्पोर्टी असावा, असा प्रयत्न सायकलस्वारांचा असतो. 

पूर्वीप्रमाणे लोक सायकली दुरुस्तीसाठी खर्च असल्याने नवीन सायकली विकत घेतात. सध्या या व्यवहारामध्ये साधारण 15 टक्के वाढ झाली आहे. दसरा-दिवाळी निमित्ताने सायकली खरेदीसाठी लोक आतापासूनच विचारपूस करू लागले आहेत. जे पूर्वी क्वचितच दिसत असे. वाढत्या मागणीमुळे बाजारात सुट्या साहित्याचा तुटवडा असल्याने किमतीतही वाढ झाली आहे. 
- अभिषेक गोतावडे 
शशिकांत सायकल मार्ट, रोहा 

सायकल चालवताना शरीराचा संपूर्ण व्यायाम होतो. यातून स्नायूंना बळकटी मिळते. मध्यंतरी कामाच्या व्यापामुळे सायकल वापरणे सोडून दिले होते. लॉकडाऊनमध्ये सायकलीची आठवण झाली. चार महिन्यांपासून सायकल चालवल्याने खूप फ्रेश वाटते. 
- समाधान पाटील 
निवृत्त शिक्षक, अलिबाग

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycle sales increase by 15% in Raigad