Vidhan Sabha 2019 : माझा विजय ठरलेला होता पण...: बिचुकले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

मुंबई : मुंबईकरांनी मला प्रचंड प्रेम दिले. माझा विजय ठरलेला होता. पण, मला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वापरावा लागला, असा आरोप कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.

मुंबई : मुंबईकरांनी मला प्रचंड प्रेम दिले. माझा विजय ठरलेला होता. पण, मला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वापरावा लागला, असा आरोप कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून बिचुकले यांनी निवडणूक लढवली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान बोलताना बिचुकले म्हणाले, 'मुंबईकरांनी आपल्याला खुप प्रेम दिले. वरळीतून मी निवडणूक अर्ज भरला. परंतु, माझी लोकप्रियता पाहून आपला पराभव करण्यासाठी पैशांचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वरळीतून तब्बल चार कोटींची रक्कम जप्त केली. ही रक्कम अभिजीत बिचुकलेंना हरवण्यासाठी वापरण्यात आली. मी मुंबईत आलो, मला मुंबईकरांनी प्रचंड प्रेम दिले. माझी लोकप्रियता पाहून मला पाडण्यासाठी पैसे वाटण्यात आले.'

राजकारणातील नेते हेच सगळ्यात मोठे अभिनेते असतात. राजकीय नेते गंडवागंडवी करतात... लोकांना फसवतात. उद्धव ठाकरे 10 रुपयामध्ये थाळी कशी देतात हे मला पाहायचेच आहे. मीच छत्रपतींचा खरा वारसदार आहे. आदित्यला काय कमी आहे? त्यामुळे त्यांनी निवडणूक का लढवावी?, असेही बिचुकले म्हणाले. आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूकीला उभे राहिल्यानंतर शिवसेनेकडून किंवा ठाकरे कुटुंबीयांकडून कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नसल्याचे बिचुकले यांनी मान्य केले.

दरम्यान, बिचुकले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती केवळ 78 हजार 503 रुपये एवढी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. बिचुकले यांनी आपल्याकडे दागिने, मोटार, पॉलिसी असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. 75 हजार रुपयांची रोख रक्कम असून, याशिवाय तीन बॅंकांमध्ये 3 हजार 503 रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपली एकूण संपत्ती 78 हजार 503 एवढी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss fame abhijit bichukale said thackeray family used money to defeat me worli