esakal | मोठी बातमी - मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

बोलून बातमी शोधा

Mumbai corona Virus Updates
मोठी बातमी - मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत नव्या रुग्णांची संख्या स्थिरावली असून आज नव्या रुग्णांपेक्षा तिप्पट रुग्ण कोरोनातून बरे झाले. आज दोन महिन्यांनंतर नवीन रुग्णांचा आकडा 3876 पर्यंत खाली आला. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6,31,527 इतका झाला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 70,373 हजारांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर 1.17 वरून कमी होत 1.09 टक्के इतका झाला आहे. 

मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात असली तरी मृतांचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. सोमवारी देखील दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 12 हजार 853 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 42 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 41 पुरुष तर 29 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  24 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 43 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

हेही वाचा: सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

मुंबईत कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 52,72,062 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.09 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 62 दिवसांवर आला आहे. मुंबईत गुरुवारी 9150 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5,46,861 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 70,373 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबईत 104 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1084 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 21,471 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 967 करण्यात आले.

हेही वाचा: चांगली बातमी: मुंबईच्या हवेसाठी लॉकडाऊन सकारात्मक

जी उत्तर मध्ये 94 नवे रुग्ण

मुंबई प्रमाणे जी उत्तर मधील रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 94 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 23,806 झाली आहे.धारावीत आज 25 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6350 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 30 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8679 झाली आहे. माहीम मध्ये 39 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 8777 इतके रुग्ण झाले आहेत.