Bihar Election : सुशांतसिंह राजपूत मुद्द्यावर मतभिन्नता; नितीश यांना कामाएवढेच यश

कृष्ण जोशी
Tuesday, 10 November 2020

बिहारमध्ये भाजप आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी खुद्द नितीश कुमार यांच्या पक्षाचे वर्चस्व कमी झाले आहे

मुंबई, ता. 10 : अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरला तसेच गेली तीन चार वर्षे विकासकामांवर भर न दिल्याची फळे नितीशकुमार यांना भोगावी लागली, असे मतप्रवाह मुंबईकर बिहारी जनतेत आहेत. 

बिहारमध्ये भाजप आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी खुद्द नितीश कुमार यांच्या पक्षाचे वर्चस्व कमी झाले आहे. एकीकडे भाजपने सुशांतसिंह राजपूतच्या मुद्यावर छुपेपणाने भर दिल्याने त्यांना त्याचा फायदा मिळाला. तर लालूंबरोबरच्या युती राजवटीत केलेला गोंधळ निस्तरतानाच नितीश कुमार यांची दोन तीन वर्षे गेली. त्यामुळे त्यांना विकासकामांवर फारसा जोर देता आला नाही. मात्र त्याचवेळी लालूपुत्र तेजस्वी यांनीही आपला वेगळा ठसा उमटवला आहे, असेही बोलले जात आहे. यावेळी तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली यूपीए महाआघाडी सत्तेवर येईल, असेही येथील बऱ्याच मूळच्या बिहारी नागरिकांना वाटत होते. 

Bihar Election : "नितीशकुमारांना मुख्यमंत्री करावेच लागेल; नितीशकुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत"

एरवी लॉकडाऊनचा त्रास आणि देशभरातून परत आलेले मजूर यांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये भाजप-नितीश यांच्याकडे दुसरा मुद्दाच नव्हता. त्यामुळे त्यांनी सुशांतचा मुद्दा बिहारी अस्मितेशी जोडून मतांचे आपल्याकडे ध्रुवीकरण केले. केंद्रानेही यात आपल्यापरीने पावले उचलल्याने ठाकूर मते भाजपकडे आली, असे खासगी नोकरदार कृष्णा शुक्ला यांनी सांगितले. त्यामुळे बिहारमधील अव्यवस्थेचे अन्य सर्व मुद्दे बाजूला पडले व लोकांचे लक्ष अन्यत्र वेधले गेले. त्यातही तेजस्वी यांनी चांगली लढत दिल्याने ही निवडणुक एकतर्फी झाली नाही व मधल्यामधे काँग्रेसची फजिती झाली, असेही त्यांनी दाखवून दिले. 

तर सुशांतसिंह प्रकरणाचा परिणाम नक्कीच झाला, त्याचमुळे ही निवडणुक तोडीस तोड झाली. यावेळी मोदी-नितीश यांची लाट नव्हती व तशा परिस्थितीत तेजस्वी यादव यांनी चांगलीच लढत दिली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशभरातील मजूर बिहारमध्ये परत आले व त्यामुळे एनडीएची मते कमी झाली. पण केंद्रात व राज्यात समविचारी सरकार हवे या उद्देशाने लोकांनी एनडीएला मते दिली, असे जव्हेरी बाजारातील हिरे व्यापारी चंद्रशेखर शुक्ला म्हणाले.

​Bihar Election : मुंबईतील बिहारींच्या बिहार विधानसभा निकालानंतर काय आहेत अपेक्षा?

नरेंद्र मोदी यांची लाट असती किंवा नितीश कुमार यांच्या सुशासनाचा प्रभाव असता तर एनडीएला मोठा विजय मिळायला हवा होता. त्यातही वडील तुरुंगात असलेल्या मुलाने स्वतःच्या हिमतीवर कोणाचीही मदत न घेता पारडे जवळपास आपल्या बाजुला फिरवले हा त्याचा पराभव निश्चित नाही. आता लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी-नितीश यांनी कामे न केल्यास त्यांना फटका पडेल हे निश्चित असेही शुक्ला म्हणाले. 

तर सुशांतचा मुद्दा शेवटच्या टप्प्यात उरलाच नव्हता, त्यामुळे त्याने फार फरक पडल्याचे मला वाटत नाही, असे खासगी नोकरदार अमित अंशू यांनी सांगितले. गेली दहा वर्षे नितीशकुमार यांनी चांगले काम केले, मात्र मधल्या काळात दोन तीन वर्षे लालूंसोबत केलेल्या आघाडीकाळात झालेला गोंधळ निस्तरण्यात ही काही वर्षे गेली. त्याचमुळे नितीशकुमार यांना काम दाखवता आले नाही. त्यांच्याकडे तरुण चेहराही कमी पडला, दुर्गापूजा मिरवणुकीवर मुंगेर येथे झालेला गोळीबार आदी कारणांचा फटकाही मोदी-नितीश आघाडीला बसला, असेही ते म्हणाले.

bihar election results views of biharis in mumbai on using sushants name in campaign


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election results views of biharis in mumbai on using sushants name in campaign