मुंबईत एक हजार ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी; उष्माघातावर मनपाकडून सोय

मुंबईत ‘बर्डबाथ’ची सुविधा
birds
birdssakal

मुंबई : वाढलेल्या तापमानाचा फटका पक्ष्यांनादेखील बसत आहे. वाढलेले काँक्रीटीकरण, पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी आवश्यक असणाऱ्या वृक्षांच्या तोडीमुळे पक्ष्यांचा निवारा उद्‍ध्वस्त झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. पक्ष्यांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांकरिता आता उद्यानांसारख्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाण्याची सोय केली जाणार आहे.

एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात मुंबई शहरात पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत चालले आहेत. साहजिकच त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. मुंबईसारख्या शहरात आपल्या आजूबाजूला सहजच दिसणारे पक्षी जसे की कावळा, पोपट, चिमण्या, मैना, सूर्यपक्षी, कबूतर इत्यादींना पाणी पिण्यासाठी नवनवीन जागा शोधाव्या लागत आहेत. तहानेने व्याकूळ झालेल्या पक्षांकरिता आता उद्यानांसारख्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाण्याची सोय केली जाणार आहे. दाट हिरवळ व आल्हाददायक वातावरण यामुळे पक्षी उद्यानांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पक्ष्यांना सहजरीत्या पाणी उपलब्ध होईल, याकरिता उद्यान विभागाने त्यांच्या ताब्यातील एक हजारच्या आसपास असलेल्या उद्यानांमध्ये पाण्याने भरलेली पात्र विविध ठिकाणी ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे काम सुरू करण्यात आले असून आठवड्याभरात हे काम पूर्ण करणार असल्याचे उद्यान विभागाचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

उपचारासाठी पक्षी रुग्णालयात...

परळ येथील बैलघोडा पशुवैद्यकीय रुग्णालयात पक्षी उपचारासाठी आणले जात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत; तर काहींना उपचारानंतर निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात येत आहे. त्यांचा किलबिलाट उष्माघातामुळे कमी झाला असून पक्षांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने ते निपचित पडून असल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यातीलच १०० हून अधिक पक्ष्यांवर परळ येथील बैलघोडा पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. यात सर्वात जास्त प्रमाण कबूतर, कावळे, घारींचे प्रमाण आहे. उष्माघातामुळे पक्षांच्या शरीरातील पाणी आणि ग्लुकोज कमी होते. त्यामुळे अशक्तपणा आलेले पक्षी झाडाच्या आणि थंडाव्याचा आडोसा शोधतात. त्यानंतर निपचित पडलेल्या पक्ष्यांवर कावळे आणि इतर पक्षी हल्ले करतात. त्यात जबर जखमी झालेले अनेक पक्ष्यांना उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागतात. अशा पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पक्षीप्रेमी करत आहेत.

पक्ष्यांसाठी ‘हे’ लक्षात ठेवा...

शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.

पाण्याचे भांडे दररोज स्वच्छ करा.

पाण्याचे स्रोत प्रदूषित करू नका.

पक्षी अडकलेल्या किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास, आवश्यक असल्यास बचाव करण्यासाठी वन विभाग किंवा जवळच्या एनजीओला कॉल करा.

जखमी पक्ष्याला स्वतः हाताळण्याचा किंवा उपचार करण्याचा प्रयत्न करू नका.

जखमी, आजारी पक्ष्यांना पशुवैद्यकांकडे न्या.

पक्ष्यांना त्रास होईल असे खाणे देऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com