जन्म-मृत्यूचे दाखले आता ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

मुंबई - जन्म-मृत्यूचा दाखला आता ऑनलाइन पद्धतीने जगात कुठेही मिळू शकेल. सुमारे 80 लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन देण्याचा मार्ग खुला होणार आहे. देश-विदेशांतील मुंबईकरांना जन्म-मृत्यू दाखला सहजपणे मिळू लागेल.

मुंबई - जन्म-मृत्यूचा दाखला आता ऑनलाइन पद्धतीने जगात कुठेही मिळू शकेल. सुमारे 80 लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन देण्याचा मार्ग खुला होणार आहे. देश-विदेशांतील मुंबईकरांना जन्म-मृत्यू दाखला सहजपणे मिळू लागेल.

ऑनलाइन प्रमाणपत्रांवर "क्‍यूआर कोड' असल्याने प्रमाणपत्रांची अधिकृतता व विश्‍वासार्हता सहज तपासता येईल, अशी माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. सुमारे 25 वर्षांतील मृत्यूविषयक नोंदी महापालिकेच्या "ईआरपी' (एंटरप्राईज रिसोर्स प्लानिंग) अर्थात, "सॅप' संगणकीय प्रणालीद्वारे यापूर्वीच अद्ययावत करण्यात आल्या आहेत. 1990 पासून 2015 पर्यंतच्या जन्माच्या नोंदीही संगणकीय प्रणालीवर नोंदवण्यात आल्या आहेत. त्यानुसार सुमारे 80 लाख नोंदी महापालिकेने यापूर्वीच डिजिटलाईज्ड केल्या आहेत. या सर्व नोंदींशी संबंधित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या www.crsorgi.gov.in या संकेतस्थळावर लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. केसकर यांनी दिली.

प्रमाणपत्रे ऑनलाइन देताना या सर्व प्रमाणपत्रांवर "क्‍यूआर कोड' (क्विक रिस्पॉन्स कोड) नमूद केला जाईल. त्यामुळे या प्रमाणपत्रांची अधिकृतता ऑनलाइन पद्धतीनेच तपासता येईल. त्याअंतर्गत जन्म-मृत्यूविषयक प्रमाणपत्रावरील "क्‍यूआर कोड' ऍण्ड्रॉईड आधारित भ्रमणध्वनीमधील "क्‍यूआर कोड रीडर' या ऍपच्या साह्याने कॅमेऱ्याद्वारे स्कॅन केल्यास भ्रमणध्वनीवर इंटरनेट ब्राऊजरवर संबंधित संकेतस्थळावरील प्रमाणपत्राचे पान उघडले जाईल.

Web Title: birth-death certificate online