अर्रर्र.. रा.. रा.. खतरनाक.. वाढदिवस साजरा करायला गेले अन तुरूंगात पोहचले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

अलिकडे वाढदिवसाच्या पार्ट्यांचा तरुणांमध्ये अतिरेक होत चाललेला दिसत आहे. वाढदिवस झाला तर खतरनाक झाला पाहिजे यासाठी तरूण भलतीच डेंरिग करत आहेत.

ठाणे : अलिकडे वाढदिवसाच्या पार्ट्यांचा तरुणांमध्ये अतिरेक होत चाललेला दिसत आहे. वाढदिवस झाला तर खतरनाक झाला पाहिजे यासाठी तरूण भलतीच डेंरिग करत आहेत. मात्र अशी डेंरिग कधी कधी अंगलट येते.. मित्राच्या वाढदिवसानिमित्त आणलेला केक तलवारीच्या साह्याने कापण्याची हौस बर्थडे बॉयसह मित्रांना  भोवली आहे.

याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी बर्थ डे बॉय परमेश्वर राठोड (32) यांच्यासह त्याचा मित्र किरण धावडे (24) या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी तलवारीने केक कापताना त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियात व्हायरल केले होते. त्यानंतर हा आततायी प्रकार उघडकीस आला होता. याविरोधात तातडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ही बातमी वाचा- उल्हासनगरमध्ये सैराट... भाऊजीला घातल्या गोळ्या
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मनोरमानगर येथील शिवसेना शाखेनजीक हा प्रकार मंगळवारी घडला. त्याच परिसरात राहणाऱ्या परमेश्वर राठोड या तरुणाचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या मित्रांनी येथील चौकात केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, राठोड याचा मित्र किरण धावडे याने केक कापण्यासाठी त्याच्या घरी असलेली एक तलवार आणली. या तलवारीच्या मदतीने परमेश्वरने वाढदिवसाचा केक कापला.

तसेच त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियात व्हायरल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. पी. पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने कारवाई करून परमेश्वर आणि किरण या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday cake was cut by sword, two arrested