चक्क पोलिस ठाण्यातच साजरा केला गुन्हेगाराचा वाढदिवस; 5 पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अन् तोही चक्क पोलिस ठाण्यात. ही घटना भांडुपमधील पोलिस ठाण्यात घडली.

मुंबई : वाढदिवस साजरा करताना रस्त्यावर किंवा हॉटेलमध्ये केल्याचे अनेकदा आपण पाहिले असेलच. मात्र, एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अन् तोही चक्क पोलिस ठाण्यात. ही घटना भांडुपमधील पोलिस ठाण्यात घडली. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले.

भांडुप पोलिस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोड उठली. या प्रकारामुळे भांडुपमधील रहिवाश्यांमध्येही नाराजीचे वातावरण होते. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. तसेच 5 पोलिसांचे निलंबनही करण्यात आले आहे, याबाबतची माहिती सहपोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली. 

पोलिस उपनिरीक्षक सचिन कोकरे आणि पंकज शेवाळे तर हेड कॉन्स्टेबल सुभाष घोसाळकर, पोलिस नाईक अनिल गायकवाड आणि पोलिस कॉन्स्टेबल मारुती जुमदे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. 

काय आहे प्रकरण?

भांडुपमधील सोनापूर येथील रहिवासी आयान खान उर्फ उल्ला या गुंडाचा वाढदिवस पोलिस ठाण्याच्या चौथ्या मजल्यावरील एका खोलीत साजरा करण्यात आला. पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केक भरवताना, गळाभेट देत शुभेच्छा देतानाचे व्हिडिओ, फोटो उल्लानेच व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला ठेवले. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday Celebrated of Goons in Police Station 5 Police Suspended