वर्चस्वासाठी भाजप लढणार प्रभाग समितीची निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - स्थानिक विभाग पातळीवर वर्चस्व निर्माण व्हावे व स्थानिक पातळीवरील कामे करता यावीत, यासाठी पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस रंगण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - स्थानिक विभाग पातळीवर वर्चस्व निर्माण व्हावे व स्थानिक पातळीवरील कामे करता यावीत, यासाठी पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावणाऱ्या भाजपने मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस रंगण्याची शक्‍यता आहे. 

महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागांवर; तर भाजपने अगदी बरोबरीत ८२ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या जागा ८८; तर भाजपला एक अपक्ष व अभासेच्या गीता गवळी यांनी पाठिंबा दिल्याने भाजपच्या जागा ८४ झाल्या. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार चुरस होती. भाजप महापौर, उपमहापौरसह कोणत्याही समित्यांची निवडणूक लढवणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. शिवसेनेचे संख्याबळ भाजपपेक्षा जास्त असल्याने महापालिकेत शिवसेनेचाच महापौर झाला. महापौर निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे सत्तेतही नाही व विरोधी पक्ष म्हणूनही नाही, अशी भाजपची स्थिती आहे. महापालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक न लढवण्याच्या घोषणेनंतर महत्त्वाच्या समित्या आणि पदे मिळण्याची संधी भाजप नगरसेवकांनी गमावली होती. यामुळे अनेक भाजप नगरसेवक नाराज होते. अखेर नगरसेवकांच्या दबावामुळे भाजपने प्रभाग समिती निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याबळ जास्त असलेल्या ठिकाणी भाजप निवडणूक लढवणार आहे. यासाठी कोणाकडेही मदत मागणार नाही आणि मदत देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी भाजपचे बहुमत नाही त्या ठिकाणी शिवसेनेचेही बहुमत नसेल, तर सेना-भाजप एकमेकांना मदत करणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. 

निवडणूक प्रक्रिया १७ मार्चपासून
येत्या १७ मार्चपासून प्रभाग समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रत्यक्ष निवडणूक २१, २२  व २५ मार्च रोजी होईल. १७ प्रभाग समित्यांसाठी या निवडणुका होतील. संख्याबळानुसार निवडणुका लढल्यास शिवसेनेला चार; तर भाजपला पाच प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे मिळतील. या समित्या हाती घेऊन स्थानिक पातळीवर वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे समजते.

Web Title: BJP election committee shall Division