मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपची कोर्टात धाव..

BMC
BMC

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यावर मुंबई महानगरपालिकेत भाजपाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. तसेच विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला होता. मात्र हे पद भाजपाला देण्यात न आल्याने भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिकेच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

या याचिकेद्वारे भाजपाला विरोधी पक्षनेते पद देण्यात यावे अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. या याचिकेत शिंदे यांनी राज्याचा नगरविकास विभाग, मुंबई महानगरपालिका, पालिका आयुक्त आणि महापौर यांना प्रतिवादी बनविले आहे. 

मुंबई महापालिकेत २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. याच काळात शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून भाजपाने साथ दिली. मात्र केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता येताच भाजपाने २०१७ मधील महापालिकेची निवडणूक शिवसेनेची साथ न घेता लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. 

मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराला भाजपाने पाठिंबा देऊन मतदान केले होते. निवडणूक झाल्यावर भाजपाने विरोधी पक्ष नेते पदावर दावा न केल्याने पालिकेतील विरोधी पक्ष नेते पद दोन ते तीन महिने रिक्त होते. यामुळे काँग्रेसने या पदावर दावा केला होता. त्यावर तत्कालीन भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी भाजपा कोणतेही पद घेणार नसल्याचे व पहारेकऱ्याची भूमिका पार पाडेल असे घोषित केले होते. त्यामुळे संख्येने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. शिवसेनेने राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्याचवेळी भाजपाने मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. भाजपाने विरोधी पक्ष नेते पदावरही दावा केला. मात्र पालिकेच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला विरोधी पक्ष नेते पदावर नियुक्त केल्यावर त्याने राजीनामा दिल्यास, त्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यास त्याला या पदावरून हटवता येऊ शकते. 

पालिकेत विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेसच्या रवी राजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची या पदावर नियुक्ती केली असल्याने भाजपाला हे पद देता येऊ शकत नाही असे पालिकेच्या वतीने महापौरांनी सभागृहात स्पष्ट केले होते. यामुळे विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती केली जावी यासाठी भाजपाने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. 

त्यानुसार प्रभाकर शिंदे यांनी मुंबई  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसाचा कालावधी देण्यात आला असून त्यांनी आपले म्हणणे मांडल्यावर या याचिकेवर सुनावणी होईल अशी माहिती शिंदे यांनी दिली. तर माझे म्हणणे मांडण्यासाठी माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही सूचना आली नसल्याची माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.
BJP goes to court for leader of opposition position in bmc 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com