शिवसेनेचा 'मी मुंबईकर' भाजपकडून हायजॅक

महेश पांचाळ
बुधवार, 4 जानेवारी 2017

सोशल मीडियामधून प्रचारात घेतली आघाडी 

मुंबई : हक्काची मराठी मते पदरी असताना अन्य भाषिक दुखावले जाऊ नयेत म्हणून शिवसेनेने 2007 मध्ये प्रचारात आणलेली "मी मुंबईकर' ही संकल्पना यंदा भाजपकडून हायजॅक करण्यात आली. स्वबळावर कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई भाजपने सोशल मीडियाद्वारे प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. 

सोशल मीडियामधून प्रचारात घेतली आघाडी 

मुंबई : हक्काची मराठी मते पदरी असताना अन्य भाषिक दुखावले जाऊ नयेत म्हणून शिवसेनेने 2007 मध्ये प्रचारात आणलेली "मी मुंबईकर' ही संकल्पना यंदा भाजपकडून हायजॅक करण्यात आली. स्वबळावर कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई भाजपने सोशल मीडियाद्वारे प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रचंड विश्‍वास आहे. ते मुंबईचा कायापालट करून सुखाचे दिवस दाखवतील. माझा या गोष्टीवर विश्‍वास आहे आणि तुमचा..... मी मुंबईकर,'' अशा आशयाचा सोशल मीडियावर भाजपच्या वतीने व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच, अगोदर फुटपाथ मोकळे करा मग धोरण आणा... मी मुंबईकर, युवा मतदार जागृत झाला असून त्याला आपल्या हक्कांची जाणीव झाली... मी मुंबईकर. या व्हॉटसअपवरील संदेशाबरोबर गेले वीस वर्षे नगरसेवक असलेल्या सध्याच्या सर्व नगरसेवकांनी आपले पूर्वीचे आणि आताचे उत्पन्न जाहीर करून मुंबईकरांसमोर आदर्श ठेवावा, कंत्राटात नगरसेवकांना मलई मिळते असा आरोप खोटा ठरवावा, असे आवाहन करण्यात भाजपतर्फे आले आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सत्ताधारी शिवसेना आणि पालिकेतील कंत्राटदारांच्या अभद्र युतीबाबत अनेकदा आरोप केले होते. त्यामुळे सोशल मीडियातून कोणाचेही नाव न घेता शिवसेनेच्या नगरसेवकांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. 

मी मुंबईकर ही संकल्पना मांडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या 2007 च्या निवडणुकीअगोदर मराठी मतांबरोबर अन्य भाषकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला होता. राज ठाकरे यांच्या मनसेकडून मराठी मतांचा जोगवा मागितला असताना उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकर या राजकीय संकल्पनेतून महापालिकेवर भगवा झेंडा फडकविला होता. गेले अनेक वर्षे जो मुंबईत राहत आहे. मुंबईच्या मातीत जन्मला आहे तो मुंबईकर. असे प्रचारातून सांगत मराठी भाषिकांबरोबर अमराठी मते शिवसेनेच्या पारड्यात पाडून घेण्यात यश आले होते. त्यामुळे भाजपसोबत शिवसेनेने युती करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली होती. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील एकूण लोकसंख्या पाहिली तर, मराठी माणसांची टक्केवारी 25 टक्‍क्‍यांहून कमी झाली आहे. त्यामुळे केवळ मराठी मतांवर महापालिकेवर झेंडा फडकविला जाणे शक्‍य नाही, हे भाजपच्या मराठी अध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यामुळे थेट प्रचार न करता , सोशल मीडियाद्वारे मी मुंबईकर म्हणून भाजपकडून चालविलेल्या प्रचाराला शिवसेना कशी उत्तर देते, याकडे आता लक्ष लागले आहे. 

Web Title: bjp hijacks sena's mumbaikar password