अजित पवार म्हणतात.., घराच्या अंगणाला रणांगण बनवणे शहाणपण नाही!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

स्वत:च्या घराच्या अंगणालाच "रणांगण' बनवणे याला शहाणपण म्हणत नाही. राज्यातील डॉक्‍टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करून कोरोनाविरुद्ध शर्थीने लढत आहे; मात्र त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकावून आंदोलन करणे हा समस्त कोरोना योद्‌ध्यांचा, राज्यातील जनतेचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

मुंबई : स्वत:च्या घराच्या अंगणालाच "रणांगण' बनवणे याला शहाणपण म्हणत नाही. राज्यातील डॉक्‍टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करून कोरोनाविरुद्ध शर्थीने लढत आहे; मात्र त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकावून आंदोलन करणे हा समस्त कोरोना योद्‌ध्यांचा, राज्यातील जनतेचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

ही बातमी वाचली का? राज्यात १७ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती; सरकारचा मोठा निर्णय
 
राज्य कोरोनाविरुद्धची एकजुटीने लढाई लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, राज्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचे आणि भाजपचे काहीही भले होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचे काळे आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्‍यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्‍न आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

ही बातमी वाचली का? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जितेंद्र आव्हाडांनी सुचवली ही कल्पना...

आकडेवारीचा दावा फोल 
गेल्या महिन्यात काही संस्थांनी संभाव्य आकडेवारीनुसार 15 मेपर्यंत मुंबईत साडेसहा लाख कोरोना रुग्ण असतील, असा अंदाज वर्तवला होता; मात्र आज राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या आत आहे. त्यांच्यापैकी 10 हजार रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. राज्याने गेला सव्वा महिना सहा लाखांहून अधिक परप्रांतीय मजुरांच्या निवास, भोजन आणि वैद्यकीय उपचारांची सोय केली. आजमितीला पाच लाख परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात सुखरूप परतले आहेत, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP insults Corona warriors! Deputy Chief Minister Ajit Pawar targets BJP