Kabutar khana
ESakal
Kabutarkhana Ban: बंदी उठणार, कबुतरखाने पुन्हा सुरू होणार; भाजप नेत्या मनेका गांधी यांचा विश्वास
मुंबई : ‘‘कबुतरांमुळे पर्यावरणाला काेणताही धाेका नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण वाढण्याचा सर्वाधिक धाेका आहे,’’ असे भाष्य माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांनी कबुतरखाने बंदीवरून शनिवारी केले. शहरात कबुतरखान्यांवर घालण्यात आलेली बंदी उठून लवकरच ते सुरू हाेतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
भाजप नेत्या मनेका गांधी या शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आल्या हाेत्या. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे भाष्य केले. गांधी म्हणाल्या, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल अनुकूल असेल,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई महापालिकेने गेल्या महिन्यात दादर येथील कबुतरखाना बंद केला आहे. तसेच शहरातील इतर जुने कबुतरखानेही सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, ‘‘भारताचा पाया करुणेवर आहे. स्वत: जगा आणि इतरांना जगू द्या, हे आपले तत्त्वज्ञान आहे. कबुतरांमुळे कोणी मेल्याचे किंवा त्यांच्यामुळे कोणाला नुकसान झाल्याचेही उदाहरण नाही.’’
अनियंत्रित जंगलतोड
भारताच्या पर्यटनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर त्यांनी टीका केली. अनियंत्रित जंगलतोड आणि नैसर्गिक संपत्तीकडे दुर्लक्ष केल्याने पर्यटनाचे आकर्षण कमी हाेत आहे. तुम्ही जितकी जास्त झाडे तोडाल, स्थानिक संस्कृती नाहीशी कराल तितका पर्यटकांचा ओघ कमी हाेईल, असे त्या म्हणाल्या. गेल्या दशकात सुमारे २१ लाख हेक्टर जमिनीवरील झाडे तोडण्यात आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
कबुतरांची पैदास दीडशे पटीने वाढली आहे. नागरिकांना त्याचा उपद्रव होत आहे. लोक आजारी पडत असून, भरवस्तीत कबुतरखाने असावेत, असा अट्टाहास कशासाठी? मनेका गांधी यांचे हे मत असू शकते.
- मनीषा कायंदे, मुख्य प्रवक्त्या, शिवसेना