२०२२मध्ये भाजपचा महापौर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

स्वबळावर सत्तास्थापनेचा पक्षाकडून ट्विटरवर ट्रेंड

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षामुळे मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजपकडून उमेदवार दिला जाण्याची शक्‍यता होती, परंतु भाजपने संख्याबळाचा मुद्दा आणि विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती करणार नाही असे सांगत निवडणुकीतून माघार घेतली. पुढील महापौर भाजपचाच, असे भाजपने जाहीर केल्यामुळे या ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेत ‘फिफ्टी-फिफ्टी’ वाटा या फॉर्म्युल्यावर ठाम राहिली. त्यामुळे महायुतीत वितुष्ट आले. परिणामी, निवडणुकीचा निकाल २४ ऑक्‍टोबरला जाहीर होऊनही १५ दिवसांत महायुतीला सरकार स्थापन करणे शक्‍य न झाल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली. त्यानंतर केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारमधून शिवसेना बाहेर पडली. त्यामुळे अधिकृतपणे जाहीर झाले नसले, तरी भाजप-शिवसेना युती तुटल्यासारखेच आहे. या घडामोडींचे पडसाद मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे होती.

भाजपचे खासदार तथा महापालिकेतील गटनेते मनोज कोटक व आमदार तथा माजी मुंबई अध्यक्ष अॅड.  आशिष शेलार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सपच्या गटनेत्यांसोबत सलग चर्चा केली. या तिन्ही पक्षांनी आपण भाजपच्या विरोधातच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने या वेळी महापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे समाजमाध्यमांवरून जाहीर केले. त्याचबरोबर भाजपने २०२२ मध्ये स्वबळावर महापौर निवडून आणणार असल्याचा ट्रेंड चालवला.

अभद्र युती नाही
भाजपचे आमदार शेलार आणि खासदार कोटक यांनी महापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. मुंबई महापालिकेत आम्ही तुल्यबळ आहोत; मात्र आमच्याकडे संख्याबळ नाही. विरोधी विचारांशी अभद्र युती करणार नाही, असे त्यांनी नमूद केले. भाजप २०२२ मध्ये मुंबईचा महापौर स्वबळावर निवडून आणणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mayor in 2022