मुंबई महापालिकेला 'हा' पुरस्कार द्या, भाजप महिला आमदार संतापल्या

पूजा विचारे
Friday, 17 July 2020

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत पालिकेवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेला नागरिकांच्या 'जीवितहानीचा पुरस्कार' द्या, अशा शब्दात मंदा म्हात्रे यांनी पालिकेवर टीका केली आहे.

मुंबईः फोर्ट भागातील GPO पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली भानुशाली इमारत गुरुवारी कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता ९वर पोहोचला असून तीन जखमी झालेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण दबल्याची भीती व्यक्त केली जातेय. अजूनही शोधकार्य सुरु असल्याची माहिती एनडीआरएफनं दिली आहे.  आतापर्यंत २३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत पालिकेवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेला नागरिकांच्या 'जीवितहानीचा पुरस्कार' द्या, अशा शब्दात मंदा म्हात्रे यांनी पालिकेवर टीका केली आहे. मुंबईतल्या भानुशाली इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्यावरुन त्यांनी पालिकेला खडेबोल सुनावलेत. 

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, मुंबईत 25 वर्षांपासून 400 धोकादायक इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेने 25 वर्षात साधं संक्रमण शिबीर उभारलं नाही. महापालिका फक्त पुरस्कार मिळवण्यासाठी दिखावा करते. सिडको निर्मित घरांमध्ये राहणाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचाः कल्याण-डोंबिवली, ठाण्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर?, रुग्णांचा आकडा धक्कादायक

पुढे त्यांनी पालिकेला इशाराही दिला आहे. मंदा म्हात्रे यांनी आज सकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. नवी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत
महापालिकेनं तात्काळ अॅक्शन प्लान तयार करावा, अन्यथा 8 दिवसानंतर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. 

मुंबईत इमारत कोसळली

गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास इमारतीचा मोठा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्याखाली अनेक जण दबले गेले.  फोर्ट भागात जीपीओ इमारतीसमोर भानुशाली इमारत आहे. भानुशाली ही इमारत पाच मजली आहे.  ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही काही कुटुंबं इमारतीत राहत होती.

अधिक वाचाः व्हिडिओ: दिल्ली-मुंबई प्रवास अवघ्या १३ तासात, गडकरींनी शेअर केली ब्लू-प्रिंट

समोर आलेल्या माहितीनुसार, भानुशाली इमारतीच्या मालकाचं नाव मोती भाटीया असं आहे. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती. दुर्घटनाग्रस्त इमारत ही रहिवाशी आणि व्यावसायिक आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत 20 जण असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बीएमसी आयुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला. त्याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही घटनास्थळी जाऊन स्थितीचा आढावा घेतला.

bjp mla manda mahtre angry bmc for fort building collapse


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mla manda mahtre angry bmc for fort building collapse