सुशांत सिंह राजपूत प्रकरणः शिवेसेनेवर गंभीर आरोप करत नितेश राणे CBI ला करणार 'ही' विनंती

पूजा विचारे
Friday, 21 August 2020

नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचं नाव का घ्यावंसं वाटलं, सीबीआयला आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार आहोत. 

मुंबईः सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत. सध्या सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआयची टीम तपास करत आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचं नाव का घ्यावंसं वाटलं, सीबीआयला आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती करणार आहोत. 

आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचं नावच घेतलं नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. भाजपच्या नेत्यांनीही युवा मंत्री असं म्हटलं आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचं आश्चर्य आहे,  असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

हेही वाचाः सुशांत सिंह राजपूत प्रकरणः बांद्रा पोलिसांकडून CBIनं घेतले पेपर्स, कूकची चौकशी सुरुच

अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही? अशी विचारणाही नितेश राणेंनी केली आहे. अनिल परब यांनी स्वतः ट्विट करत १३ तारखेला पार्टी झाल्याचं सांगितलं. तर संजय राऊत स्वतःच आदित्य ठाकरे यांचं नाव घेत आहेत आणि आव्हान देताहेत. भाजप सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणात गोवण्यासाठी इतके आतूर का झालेत हेच मला विचारायचं आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करताहेत, असा दावाही राणे यांनी केलाय. 

दरम्यान काँग्रेस पक्षात जसा जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु आहे त्याचप्रमाणे शिवसेनेतही सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जुन्या शिवसैनिकांवर पक्षात अन्याय केला जातोय. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातंय. त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. त्यामुळे अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं पाहिजे, अशी मागणीही राणेंनी केली आहे. 

अधिक वाचाः  मुंबईत क्वारंटाईनच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम

सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही टोकाला जाऊन मदत करण्यास आपण तयार आहोत, असं म्हणत इशाऱ्यावर राजकारण केलं जाऊ शकत नाही, नाव सिद्ध करु शकत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे ती योग्य वेळी सीबीआयला हवी असेल, त्यांना गरज असेल, मागितल्यास माझ्याकडे असणारी माहिती देण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांतनं पहिल्यांदा काम केलं. या मालिकेतली त्याची पहिली भूमिका ही मराठी तरुणाची होती. सुशांतहा मराठी अस्मिता जपणारा तरुण होता. त्यामुळे त्याच्यासाठी आपण उभं राहण्यास तयार असल्याचंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

मराठी तरुण, मराठी अस्मिता या गोष्टी नाइटलाइफ करताना आठवत नाहीत का? ओपन जीमचं उद्घाटन करताना नेहमी बॉलिवूड कलाकारच दिसतात. आपले मराठी कलाकार का दिसत नाहीत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही अडचण आली की मराठी अस्मिता, भूमिपूत्र हेच विषय दिसतात. मुंबई पोलिसांचं खच्चीकरण केलं जात असून त्यांच्यावर दबाव आहे. कोणाचा दबाव आहे हे सीबीआय तपासात स्पष्ट होईल, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

BJP MLA Nitesh Rane Will help CBI in sushant singh death case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Nitesh Rane Will help CBI in sushant singh death case