esakal | दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

खासदार सुनील तटकरे यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, सत्ताधाऱ्यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देण्यास भाजप सज्ज आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तटकरे यांना पेणमधील जाहीर सभेत इशारा दिला.

दरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबईः  खासदार सुनील तटकरे यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, सत्ताधाऱ्यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, त्यांना जशास तसे उत्तर देण्यास भाजप सज्ज आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तटकरे यांना पेणमधील जाहीर सभेत इशारा दिला.
 
तटकरे यांच्या दडपणामुळे पोलिसांनी भाजप नेत्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला तसेच मध्यरात्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची तपासणी केल्याचा आरोप दरेकर यांनी केला. त्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपतर्फे पेण येथे मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सत्तेच्या बळावर पोलिस यंत्रणेचा गैरवापर केल्यास त्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

पेण नगरपालिकेच्या स्थायी समितीमधील वादंगावरून गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्याविरोधात मुख्याधिकाऱ्यांनी पेण पोलिस ठाण्यात 16 ऑक्टोबरला गुन्हा नोंदवला. यासंदर्भात पोलिसांनी काहीही शहानिशा केली नाही, असा दावाही दरेकर यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ हा निषेध मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

अधिक वाचाः  लॉकडाऊनमध्ये आईचा पगार झाला बंद, १४ वर्षीय लहानगा चहा विकून चालवतोय स्वतःचं घर

तटकरे यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव टाकल्याने पोलिसांनी सारासार विचार न करता मध्यरात्रीनंतर रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली. रविशेठ पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे तटकरेंनी दाखविले आहे. आता या प्रकरणाचा जाब येत्या विधानसभा अधिवेशनात सरकारला विचारणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. 

अधिक वाचाः विवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

खरे पाहता तटकरेंशी राजकीय मैत्री करणाऱ्या इतर पक्षांचेही अस्तित्व संपविण्याचेही काम तटकरे करीत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असूनही पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेले आहे, असेही त्यांनी दाखवून दिले. तटकरे हे भाजपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानत आहेत. मात्र आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. श्रीवर्धन बँक, गोरेगाव अर्बन बँक, पेण अर्बन बँक बुडवणारे तटकरे यांचेच साथीदार असल्याचा दावाही दरेकर यांनी केला.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

BJP MLA Praveen Darekar criticizes MP Sunil Tatkare