
आपण 'त्या' मुलीला पळवून आणूः भाजप आमदार राम कदम
मुंबई: 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी (ता. 3) घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये म्हटले आहे.
राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. कदम म्हणाले, 'तुम्ही कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केले, पण ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन की, तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. आई-वडील म्हणाले की, ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा.'
दरम्यान, राम कदम यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर राम कदम यांनी हा व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा आरोप केला. या व्हिडीओच्या मागचा आणि पुढचा भाग ऐकला तर संदर्भ लागेल, अर्धवट दाखवून जनतेची दिशाभूल करु नका. आपला म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावेळचे वातावरण हलके-फुलके होते. काही राजकीय पक्ष या व्हिडीओचे राजकारण करत आहेत, असे राम कदम म्हणाले.
राम कदम यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगायला हवे. आपण काय करतोय, कुणासमोर बोलताय, उत्साहाच्या भरात काय बोलतोय याचे भान सत्ताधाऱ्यांनी राहिलं नाही. आज महिलांची स्थिती बिकट आहे, त्या असुरक्षित आहेत. त्यात अशी वक्तव्य करुन राम कदमांना नक्की काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे.
- चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या.
एका मुलीचा बाप म्हणून मला भिती वाटायला लागली. जर राम कदमांच्या मतदारसंघातील एखादा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागला, तर माझ्या मुलीला उचलून घेऊन जायचे. बाप म्हणून मला काळजी वाटायला लागली. अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. पोरगी किंवा पोरगा हा मतभेद नाही, ही गुन्हेगारी आहे.
- जितेंद्र आव्हाड, आमदार
Web Title: Bjp Mla Ram Kadams Statement Girls
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..