भाजप हा गुन्हेगारी टोळ्यांचा पक्ष - नवाब मलिक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगार टोळ्यांचा पक्ष असल्याची टीका करून मुंबई भाजपचा पदाधिकारी रियाज भाटीवर "मोका'अंतर्गत कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

मुंबई - भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगार टोळ्यांचा पक्ष असल्याची टीका करून मुंबई भाजपचा पदाधिकारी रियाज भाटीवर "मोका'अंतर्गत कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, की तस्कर दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळख असणाऱ्या रियाज भाटी हा 1993 च्या बॉंबस्फोटांनंतर फरारी झालेल्या आरोपींपैकी एक होता. त्याच्यावर खंडणी, जमीन बळकावणे, धमकावणे, 2008 मध्ये खंडाळा गोळीबार प्रकरणी गंभीर गुन्हे आहेत; तसेच भाटीला बनावट पासपोर्ट प्रकरणी अटकही करण्यात आली होती. त्याचा एक "जी-3128659' क्रमांकाचा पासपोर्ट 2007 मध्ये जयपूर येथून फुलजी भाटी नावाने तयार करण्यात आला आहे, तर दुसरा "झेड-2479378' या क्रमांकाचा पासपोर्ट 2013 मध्ये रियाज भाटी या नावाने तयार करण्यात आला आहे. या दोन्ही पासपोर्टमध्ये जन्मतारीखही चुकीची देण्यात आली आहे. हा गंभीर गुन्ह्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. 14 दिवसांचा तुरुंगवास भोगल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

सध्या तो मुंबई भाजपचा कार्यकारिणी सदस्य आहे. आशिष शेलार यांना "एमसीए' निवडणुकीत मते मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या प्राध्यापकांना धमकावण्याचे काम भाटीने केले होते. भाजपच्या सर्वच नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्याने भेट घेतली होती; परंतु एखादा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा व्यक्ती पंतप्रधानांना भेटू कसा शकतो, भेटण्याआधी "आयबी'द्वारे संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती जमा केली जाते; मग रियाज भाटी पंतप्रधानांना भेटण्याआधी माहिती नव्हती का, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासारखे अधिकारी असूनही पंतप्रधानांना भेटतेवेळी रियाजची माहिती का काढली गेली नाही, 29 ऑक्‍टोबर 2015 "आयबी'ने "रेडकॉर्नर' नोटीस काढल्यानंतर भाटीला अटक झाली होती. दाऊदच्या बैठकीला जाणार असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्या वेळी 15 दिवसांतच भाटी जामिनावर कसा सुटला, दोन डझन गंभीर गुन्हे असूनही "मोका' का लावला नाही, त्याला पोलिस सुरक्षा कशी देण्यात आली, अशा प्रश्‍नांची सरबत्ती मलिक यांनी सरकारवर केली. बाबा बोडके मुख्यमंत्र्यांना भेटतो, मुन्ना यादव कोण आहे ते जगाला माहिती आहे, छोटा राजनच्या पत्नीचा भाऊ मुंबई भाजपचा पदाधिकारी जळगावातील ललित कोल्हे, नाशिकचा पवन पवार अशा गुन्हेगारांना भाजपत राजरोस प्रवेश दिला असल्याची टीका करून मलिक यांनी भाजप गुन्हेगारी टोळ्यांचा पक्ष असल्याची टीका केली.

आघाडीबाबत बैठक
विधान परिषदेत आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मानस असल्याची माहिती मलिक यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी येत्या 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनाच विचारा - भांडारी
रियाज भाटी याचा भाजपशी अथवा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी कोणताही संबंध नाही. तो मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये एका क्‍लबचा सदस्य आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आशिष शेलार हे उपाध्यक्ष असून, नवाब मलिक यांना पडलेले प्रश्न याच असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनाच त्यांनी विचारावेत, असा पलटवार भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. भाटीचा भाजपशी अथवा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून, तो जोडण्यात येऊ नये. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असेही भांडारी यांनी म्हटले आहे.

Web Title: BJP party of criminal gangs