कोरोना लसीकरणाचा राज्यात फज्जा संपूर्ण लसीकरणास किती वेळ लागणार, भाजपचा प्रश्न

कोरोना लसीकरणाचा राज्यात फज्जा संपूर्ण लसीकरणास किती वेळ लागणार, भाजपचा प्रश्न

मुंबई:  राज्यात कोरोनाच्या सुमारे दहा लाख लशी उपलब्ध असतानाही काल मुंबईत फक्त 13 व्यक्तींना तर राज्यात 181 जणांनाच लस देण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. या गतीने राज्याच्या बारा कोटी लोकांना लस देण्यास किती वेळ लागेल, असा भेदक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.  

आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईसह राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला खीळ बसल्याचा आरोपही त्यांनी केला असून या अपयशाची जबाबदारी स्विकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

राज्यात कोरोनावरील 9 लाख 83 हजार लशी उपलब्ध असतानाही आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे ही वेळ आली आहे. तरीही फक्त राजकारणासाठी कमी लशी मिळाल्याचा आरोप राज्य सरकार केंद्रावर करीत आहे हा तद्दन खोटारडेपणा आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

ठाकरे सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे महाराष्ट्र देशाचा कोरोना राजधानी बनली आहे. कोरोना संसर्ग आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत दुर्दैवाने आजही महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य आहे. राज्याचा मृत्यदर आजही 2.54 टक्के इतका आहे.

गेल्या महिन्याभरात देशातील कोरोना रुग्णांचा दर झपाट्याने कमी होत असला तरीही आजही देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 42 टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यातील आहेत. मृत्यूदराच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असल्यामुळे राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद आणि नियोजनबद्ध कामाची आवश्यकता होती. मात्र तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला.

मुंबईतील जेजे या एकाच रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, हिच अवस्था राज्यभर आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ‘इतके कमी लसीकरण होणे यात काहीही विशेष बाब नाही’ असे वक्तव्य केल्याचा दावा भातखळकर यांनी केला. 

राज्य सरकारकडून हीच 'गती' कायम ठेवण्यात आली तर महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला लस मिळण्यास किती कालावधी लागेल याचा विचार राज्य सरकारने केला आहे काय ? असा प्रश्नही भातखळकर यांनी केला आहे.

---------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

BJP question how long will take for complete vaccination state

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com