बेकायदा बॅनरबाजीमुळे भाजप कार्यकर्त्यांना लाखोंचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सार्वजनिक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने भाजपच्या 14 आणि मनसेच्या एका कार्यकर्त्यांकडून सुमारे 3 लाख 1 हजार रुपये इतका दंड वसूल केला.

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने भाजपच्या 14 आणि मनसेच्या एका कार्यकर्त्यांकडून सुमारे 3 लाख 1 हजार रुपये इतका दंड वसूल केला. मुंबई महापालिकेने दहा महिन्यांत तब्बल 21 हजार 699 होर्डींग उतरवले असून यात सर्वाधिक 60 टक्के होर्डिंग्ज राजकीय पक्षांचे आहेत. 

मुंबईत अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावण्यावर निर्बंध आहेत, असे असतानाही जागोजागी भले मोठे होर्डिंग्ज लावून मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत. राजकीय नेत्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, आदी कार्यक्रमांच्या जाहिरातींचे होर्डिंग्ज लावले जातात. यातील बहुतांशी होर्डिंग्ज अनधिकृत असल्याच्या तक्रारींची पालिकेकडे नोंद होते.

या तक्रारीनंतर पालिकेकडून असे होर्डिंग्ज काढले जातात. तरीही नियम धाब्यावर बसवून भले मोठे होर्डिंग लटकवून शहर विद्रुप करणे सुरुच आहे. विशेष म्हणजे कारवाई करण्यात येणाऱ्या होर्डिंग्जमध्ये राजकीय पुढाऱ्यांचीच सर्वाधिक होर्डिंग असतात. पालिकेने जानेवारी ते ऑक्‍टोबर 2019 पर्यंतच्या कारवाईचा अहवाल सोमवारी परवाना विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार 21 हजार 699 होर्डिंग मुंबई शहरासह उपनगरातून काढले. त्यात 13,220 राजकीय, 2172 धार्मिक आणि 2327 व्यावसायिक होर्डिंग्ज होते. याप्रकरणी भाजपच्या 14 आणि मनसेच्या एका कार्यकर्त्यांकडून सुमारे 3 लाख 1 हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

मुंबईत होर्डिंग्ज लावण्यावर बंदी असताना राजकिय पक्ष किंवा नेत्यांकडून विनापरवाना होर्डिंग्ज लावले जातात. सातत्याने लागणाऱ्या या होर्डिंग्जवर कारवाई करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना अडचणी येतात. बहुतांशवेळा दबाव टाकला जातो. दादरमधील शिवाजी पार्क येथे पालिकेने मनसेचे कंदील काढल्याप्रकरणी वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मनसेचे संदीप देशपांडे यांना जेलची हवा खावी लागली.

भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी 2018 मध्ये पालिकेच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याप्रकरणी तब्बल 24 लाख रुपये दंड आकारला होता. 2016 मध्ये जी वॉर्डमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकावर अशाच प्रकारे कारवाई केली होती. मात्र, राजकीय पक्षांची अनधिकृत बॅनरबाजी सुरुच असल्याने महापालिका हतबल झाली आहे. 

web title : BJP workers fined millions for illegal banning


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP workers fined millions for illegal banning