
सुशांतसिंह प्रकरणात भाजप वर आरोप करणारी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली होती. त्याबाबत पुणे येथे प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली
मुंबई ः सुशांतसिंह प्रकरणात अजून सीबीआयचा अहवाल आलेला नाही, एम्सने अहवालाबाबत सीबीआयला विचारावे, असे स्पष्ट केले आहे. तरीही याबाबत प्रतिक्रिया देण्याची घाई गृहमंत्री अनिल देशमुख का करीत आहेत, बाळंतपणाआधीच बाळाचे बारसे करण्यासारखा हा प्रकार आहे, असा टोमणा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण 1 टक्के; तर लक्षण असलेल्या रुग्णांंचीही संख्या कमी
सुशांतसिंह प्रकरणात भाजप वर आरोप करणारी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली होती. त्याबाबत पुणे येथे प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना दरेकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने एका ड्रग रॅकेटचा शोध घेण्याचे काम एनसीबी, सीबीआय करते आहे. त्यांना पाठिशी घालण्यासाठी अनिल देशमुख दबाव आणत आहेत का? हे सरकार ड्रग्ज माफियांना पाठिशी घालते आहे का? याचे उत्तर आधी अनिल देशमुखांनी द्यावे आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याची हिंमत त्यानंतर करावी असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
जोकर बनण्याचा प्रयत्न नको
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शवविच्छेदन अहवाल अद्याप अधिकृत झालेला नसताना सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर आरोप करणे हास्यास्पद आहे. आपल्या निष्क्रिय कारभारामुळे महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या महाविकास आघाडी नावाच्या सर्कशीतला 'जोकर' होण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी करू नये असा मिश्किल टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.
एकीकडे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात की, राज्यातील आयपीएस अधिकारी महाविकास आघाडी सरकार पाडणार होते तर दुसरीकडे पोलीस अधिकारी भांडी घासायला ठेवण्याच्या लायकीचे असल्याचे वक्त्यव्य मुख्यमंत्री करतात. एल्गार परिषद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिलेल्या पुणे पोलिसांची पुन्हा चौकशी करण्याची भाषा करायची, त्यामुळे यातून या सरकारची पोलिसांच्या बद्दलची भावना स्पष्ट होते. त्यामुळे ठाकरे सरकारने पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचे काम बंद करावे. नाहीतर महिलांवरील अत्याचार, बलात्कार, दिवसाढवळ्या होणारे खून आणि गंभीर गुन्हे यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक येण्यास वेळ लागणार नाही हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला सुद्धा भातखळकर यांनी दिला आहे.
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत,आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा... pic.twitter.com/Qv7WAkaCMU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 6, 2020
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )