भाजपचे घोषणापत्र विकासाभिमुख 

भाजपचे घोषणापत्र विकासाभिमुख 

भिवंडी - भिवंडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने प्रकाशित केलेल्या घोषणापत्रात भिवंडीच्या विकासावर भर देण्यात आला आहे. स्वच्छ, आरोग्यदायी भिवंडी, पुरेसे पाणी, रस्ते, युवक, शहराचा नियोजनबद्ध विकास आदींबरोबरच पारदर्शक कारभाराची हमी यात देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. 20) झालेल्या जाहीर सभेत घोषणापत्राचे प्रकाशन झाले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, शहर अध्यक्षांसह उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रत्येक व्यक्तीला घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी विशेष निधी, शहरात सुरक्षेसाठी सीसी टीव्हींचे जाळे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी-ठाणे ग्रीन बस, शहरातील सर्व भागांत मोफत वाय-फाय, अद्ययावत क्रीडा संकुले, महापालिका शाळांचे पुनरुज्जीवन, मदरशांमध्ये आधुनिक सुविधा, महापालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन आदी लक्षवेधी कामांचे आश्‍वासन भाजपने घोषणापत्राद्वारे दिले आहे. 

स्वच्छतेवर भर 
भिवंडी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येक घरात स्वच्छतागृह, स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वयंसेवक, भूमिगत गटारे, कचरा उचलणाऱ्या गाड्यांवर "जीपीएस' यंत्रणा व छोटी वाहने, कचऱ्यावर प्रक्रिया, महत्त्वाच्या भागात कचराकुंड्या ठेवण्यात येण्याचे आश्‍वासन घोषणापत्रात देण्यात आले आहे. 

नाल्यातील जलवाहिन्यांची दुरुस्ती 
अमृत योजनेनुसार 206 कोटींच्या निधीतून पाणी वितरण पद्धतीत सुधारणा, नाल्यातून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांची दुरुस्ती, टॅंकरने पाणीपुरवठा होणाऱ्या भागात जलवाहिन्या, प्रत्येक सरकारी कार्यालयात पावसाळी पाणी साचविण्यासाठी यंत्रणा आदी कामांवर लक्ष देण्याची हमी भाजपने दिली आहे. 

प्रत्येक चौकात सिग्नल, पार्किंग 
शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्येक चौकात सिग्नल व पार्किंगची व्यवस्था केली जाईल. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग व पदपथाची निर्मिती, एलईडी पथदिवे. केंद्र सरकारने 60 कोटी रुपये मंजूर केलेल्या अंजूरफाटा ते थेट वंजारपट्टी नाक्‍यापर्यंतच्या नव्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही. 

आरोग्य सुविधा 
प्रत्येक नागरिकासाठी आरोग्य कार्ड तयार करून त्याची वर्षातून एकदा मोफत शारीरिक तपासणी केली जाईल. टेली-मेडिसीनद्वारे सल्ला दिला जाईल. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाला विशेष निधी देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा दिल्या जातील. हृदयविकार कक्ष, डायबिटीस सेंटर, आयसीयू, आयएनसीयू, डायग्नोसिस सेंटर, रेडिओलॉजी कक्ष सुरू केले जातील. रक्तपेढीचीही स्थापना केली जाईल. महापालिकेच्या रुग्णवाहिकेसाठी हेल्पलाईन. मंडई नाक्‍यावर नवे रुग्णालय उभारून तेथे आधुनिक सेवा देण्यावर भर. 

नियोजनबद्ध विकास 
शहराचा नियोजनबद्ध विकास केला जाणार असून, भिवंडी ते ठाण्यापर्यंत ग्रीन बस सेवा सुरू केली जाईल. शहरातील सर्वच ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध केली जाईल. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची दुरुस्ती केली जाईल. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे आधुनिकीकरण, शहरातील भाजी मार्केटचे योग्य जागी स्थलांतर, स्वीमिंग, बॅडमिंटन, टेनिससाठी क्रीडा संकुले. मुस्लिमांसाठी शादीखाना, कब्रस्तान, जैन साधूंसाठी विश्रामगृह, स्मशान घाटाचा पुनर्विकास आदी कामे केली जातील. 

पारदर्शक कारभार 
महापालिका प्रशासनाचा कारभार पारदर्शक करण्यात येऊन सेवाधिकारासाठी विशेष कक्ष सुरू केला जाईल. कोणतेही काम प्रलंबित न राहण्यासाठी "झीरो पेंडन्सी' पद्धत सुरू. तक्रारींसाठी केंद्र, पालिका कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, महापालिकेचा जमाखर्च वेबसाईटवर जाहीर केला जाईल. भाजपने जाहीर केलेले घोषणापत्र वेबसाईटवर अपलोड केले जाईल. त्यातून नागरिकांना जाहीर केलेली कामे पूर्ण झाली आहेत का, हे पाहता येईल. 

महिला सुरक्षेला प्राधान्य 
महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असून, शहरात सीसी टीव्हींचे जाळे तयार केले जाईल. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात येईल. महिला व छोट्या मुलांच्या तपासणीसाठी हेल्थ सेंटर, उज्ज्वला योजनेतून गॅसपुरवठा, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत. 

युवकांचा विकास 
महापालिका शाळांचे पुनरुज्जीवन करून शाळांमध्ये आधुनिक सुविधा, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे व करिअर मार्गदर्शन केंद्र, मदरशांमध्ये आधुनिक सुविधा, क्रीडांगणाची निर्मिती, क्रीडांगणांवरील बेकायदा बांधकामांना रोखणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com