दिवाळीत ३० तास रेवदंडा अंधारात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

 प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीची ओळख आहे; पण या उत्सवात रेवदंड्यात ३० तासांपेक्षा अधिक वीजपुरवठा खंडित होता.

रेवदंडा (बातमीदार) : प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीची ओळख आहे; पण या उत्सवात रेवदंड्यात ३० तासांपेक्षा अधिक वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे रहिवाशांना रात्र अंधारात काढावी लागली. अनेकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला.

रेवदंड्यातील खंडेराव-थेरोंडा पाड्यामधील किनारपट्टीवर असलेले तीन विद्युत खांब रविवारी (ता. २७) रात्री कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तो ३० तासांहून अधिक काळानंतर सुरळीत झाला. त्यामुळे अर्ध्या रेवदंड्याची दिवाळी अंधारात गेली. मिठाई, कापड, थंडपेये आदी व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसला. वीजपुरवठा खंडित झाल्याने वीजपंप बंद होते. त्यामुळे काही रहिवासी संकुलांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. दिवाळीसाठी गावात आलेले नोकरदार आणि व्यावसायिकही त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होते. गावात आलेले चाकरमानी आपली मुंबापुरीच बरी, असे बोलू लागले; तर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण वैतागून गेले.

वीज वितरणचे तीन खांब पडले होते. हा भाग किनारी आहे. त्यामुळे भरतीच्या काळात काम करणे शक्‍य झाले नाही. ओहोटीच्या काळात दुरुस्ती करण्यात आली. 
- परमानंद बैकर, अभियंता, वीज वितरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blackest day in Diwali for 30 Hrs