दृष्टिहीन कलेक्टरची अवयवदानाची 'दूरदृष्टी'

दृष्टिहीन कलेक्टरची अवयवदानाची 'दूरदृष्टी'

उल्हासनगर : वयाच्या आठव्या वर्षी कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचं दुर्भाग्य नशिबी आलेल्या उल्हासनगरातील प्रांजल पाटीलने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दोनदा पास करून थेट कलेक्टरपदापर्यंत झेप घेतली. प्रांजलच्या या यशाचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदन केले जात आहे. तसेच प्रांजल यांनी नुकत्याच पार पडलेल्या तिच्या भावाच्या लग्नात पतीसह दूरदृष्टीने अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

दृष्टी नसतानाही अंतर्मनाच्या दूरदृष्टीने प्रांजलने केलेल्या अवयवदानाचे डॉक्टरांसह उपस्थितांनी सलाम ठोकला आहे. प्रांजल ही एल.बी.पाटील-ज्योती पाटील या दाम्पत्याची मुलगी. तिला वयाच्या आठव्या वर्षापर्यंत सर्व दिसत होते. ती अभ्यासात खेळण्यात तरबेज होती. मात्र, इयत्ता तिसरीत असतानाच तिची दृष्टी हळूहळू लोप पावत गेली आणि तिच्या नशिबी कायमचेच अंधत्व आले. आपली लाडकी लेक दृष्टिहीन झाल्याने पालकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर होत होते. ते हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.

तिला दिसत नव्हते पण पालकांचा हुंदक्यांचा आवाज टिपून ती त्यांचे आसवे पुसत होती. 'पप्पा-मम्मी' तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे रहा. मी अंधत्वावर मात करण्यासाठी खूप उच्च शिक्षण घेणार आहे. हे तिचे वयाच्या नऊ-दहा वर्षाची असतानाच्या दूरदृष्टीच्या वाक्याने पालकांना बळ मिळाले. आता थांबायचे नाही, असा निर्धार करणाऱ्या पालकांनी तिला गल्ली ते दिल्लीपर्यंत शिक्षणासाठी पाठवले, असे असंख्य डोळस विद्यार्थी असतात जे अर्ध्यावरच हिंमत हरतात. पण ती दृष्टिहीन असतानाही तिने अभ्यासात खंड पडू दिला नाही.

जिद्द कायम ठेवली. तल्लख बुद्धिमत्तेची धनी ठरताना तिने दोनदा यूपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण केली आणि मागील वर्षी 2018 मध्ये प्रांजलच्या डोक्यावर चक्क जिल्हाधिकारीचा ताज चढला. सध्या प्रांजल केरळच्या येर्णाकुलम जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

प्रांजल यांचा भाऊ तसेच एल.बी.पाटील दांपत्याचा मुलगा निखिल याचा नुकताच विवाह सोहळा उल्हासनगरात पार पडला. या खुशीच्या सोहळ्यातच अवयवदान करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय प्रांजल व तिचे पती कोमलसिंह पाटील यांनी घेतला. त्यासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक डॉ.सतिश वाघ यांना फोन करून अवयवदानाबाबत माहिती घेतली आणि आम्हाला अवयवदान करण्याकरिता रितसर नोदणी करावयाची असून, आपण आपल्या रुग्णालयातील टीमसह विवाहस्थळी येण्यास विनंती केली.

सतिश वाघ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जाफर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक नेत्र चिकित्सक डॉ.दिलीप अहिरे, डॉ.प्रणाली बोबडे, डॉ.,फरीन अन्सारी यांच्यासोबत विवाहस्थळ गाठले आणि प्रांजल पाटील व तिचे पती कोमलसिंह यांची अवयवदानाची नोंदणी करून घेतली. त्यांना सतीश वाघ यांच्या हस्ते अवयवदानचे कार्ड देण्यात आले. विशेष म्हणजे दृष्टी नसतानाही प्रांजलने अवयवदान केल्याची प्रेरणा घेऊन सोहळ्यात आलेले नातेवाईक यांनीही नोंदणी करुन अर्ज भरून दिले.

दृष्टी नसली तरी शरीरातील अनेक अवयव हे कामाचे असून, त्यातून सात-आठ जणांचा जीव वाचू शकतो. ही दूरदृष्टी समोर ठेवून अवयवदान केल्याची माहिती प्रांजल पाटीलने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com