अंध विद्यार्थ्यांनी साकारला फुलांचा तिरंगा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

ओमकार अंध आणि विशेष शाळा, जिजाऊ सोशल ट्रस्ट, झाडपोळी, वाडा येथे मंगळवारी (ता.१३) हा अनोखा विक्रम करण्यात आला.

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त ५ ते १४ वर्षे वयोगटातील अंध विद्यार्थ्यांनी मुंबईतील श्रीरंग संस्थेतर्फे डॉ. सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ गंधाच्या आधारे फुलांचा तिरंगा साकारला. विशेष म्हणजे अंध विद्यार्थ्यांनी ही किमया साधत अनोखा विश्वविक्रमही केला, असे या वेळी सुमीत पाटील यांनी सांगितले.

ओमकार अंध आणि विशेष शाळा, जिजाऊ सोशल ट्रस्ट, झाडपोळी, वाडा येथे मंगळवारी (ता.१३) हा अनोखा विक्रम करण्यात आला. यात २५ अंध आणि विशेष विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या वेळी अंध तरुण प्रशांत बानिया याचे बासरीवादन झाले. शाळेचे मुख्याध्यापक महेश गायकवाड हे स्वत: अंध असून त्यांनीही विद्यार्थ्यांना संगीतात साथ दिली. तसेच भारतात नेत्रदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. नेत्रदानासाठी आपल्याला बांगलादेश, श्रीलंकेची मदत घ्यावी लागते. यामुळे नागरिकांनी नेत्रदान करावे, असा संदेशदेखील विद्यार्थ्यांनी दिला. 

असा साकारला तिरंगा
विद्यार्थ्यांना भगवा रंग म्हणजे झेंडू, सफेद म्हणजे मोगरा आणि हिरवा म्हणजे तुळस अशी रंग ओळख करून देण्यात आली होती. त्या आधारे या विद्यार्थ्यांनी हा तिरंगा साकारला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blind students made the indian flag of flowers