
BMC Budget 2023 : आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प उद्या ता. ४ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात मांडण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यंदा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
आरोग्य, पायाभूत सुविधांवर अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्यावर १८०० कोटींची वाढ करण्यात आल्याने एकूण ६६२४.४१ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाही यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईकरांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यासाठी पायाभूत सुविधांसाठीदेखील भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतवर्षीच्या ४५९४९.२१ कोटींच्या अर्थसंकल्पात यावर्षीही सुमारे साडेचार हजार कोटीची वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळी १०.३० वाजता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प डॉ इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. तर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक महानगरपालिका डॉ इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील.
पालिकेने गेल्यावर्षीच्या म्हणजे २०२२-२३ साठीच्या अर्थसंकल्पात मूलभूत योजना आणि लोकोपयोगी कामांसाठी एकुण २२ हजार ६४६ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली होती. परंतु मंजूर निधीपैकी पालिकेत फक्त ३७ टक्के इतकाच निधी खर्च करण्यात आला.
पालिकेने फक्त ८ हजार ३९८ कोटी रूपयांचा निधी खर्च केला आहे. तुलनेत २०२०-२१ मध्ये ४० टक्क्यांहून अधिक म्हणजे १० हजार ९०३ कोटी रूपयांचा निधी पालिकेकडून खर्च करण्यात आला होता. यंदाच्या वर्षातील प्रकल्पांमध्ये विकास प्रकल्पाअंतर्गत आरोग्य, एसटीपी प्लांट, आश्रय योजना, घनकचरा व्यवस्थापन, विकास आराखडा यासारख्या विविध विभागाअंतर्गत या निधीचा वापर यंदा करण्यात आला आहे. या निधीचा वापर करण्यासाठी पालिकेकडे येत्या मार्च अखेरीपर्यंतचा कालावधी आहे. त्यामुळे आगामी कालावधीतही या निधीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
‘कोरोनानंतर आरोग्याच्यादृष्टीने विविध सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. गेल्या वर्षी एकूण बजेटपैकी तब्बल १५ टक्के तरतूद आरोग्यावर करण्यात आली होती. या शिवाय यावर्षीच्या अर्थसंकल्पात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही विशेष तरतूद तसेच नव्या योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ४५ हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाच्य़ा अर्थसंकल्पात सुमारे साडेचार हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे.