
पालिका आता खासगी रुग्णालयांना देखील फ्रंटलाईन वर्कर्स आणि वृद्धांच्या लसीकरणासाठी केंद्रे म्हणून घोषित करू शकते.
मुंबई: पालिकेने मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांमधून तिथे काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्यांची यादी मागितली आहे. खरंतर, खासगी रुग्णालयांनाही लसीकरण केंद्र बनवण्याची मागणी केली गेली आहे. त्यानंतर, पालिका आता खासगी रुग्णालयांना देखील फ्रंटलाईन वर्कर्स आणि वृद्धांच्या लसीकरणासाठी केंद्रे म्हणून घोषित करू शकते.
मुंबईत सध्या लसीकरणाची 10 केंद्रे आहेत. त्यापैकी 9 पालिका रुग्णालये आणि एका शासकीय रुग्णालयाचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात मुंबई ट्रस्ट आणि खासगी रुग्णालयांच्या असोसिएशनच्या वतीने अशी मागणी केली गेली होती की, काही खासगी रुग्णालये देखील लसीकरण केंद्र बनवली जावीत जेणेकरून तेथे कार्यरत आरोग्य सेवा कामगारांना रुग्णालयातच लसीकरण करता येईल. अशा परिस्थितीत पालिकेने कोविन अॅपवर नोंदणीकृत कर्मचार्यांचा तपशील मोठ्या खासगी रुग्णालयांकडून मागितला आहे.
अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र बनवण्याच्या मागणीवर आम्ही विचार करत आहोत. त्यांना दुसरा टप्पा अर्थात फ्रंटलाइन वर्कर्स आणि तिसरा टप्पा म्हणजे वृद्धांना लसी देण्याची परवानगी देण्यावर विचार विनिमय सुरू आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रमुख रुग्णालयात 2000 आरोग्य सेवा कर्मचारी
मुंबईतील 50 टक्के आरोग्य कर्मचारी खासगी रुग्णालयात काम करतात. काही खासगी रुग्णालयात (प्रत्येकी) सुमारे 2000 आरोग्य सेवा कर्मचारी आहेत. कर्मचार्यांची एकमेव अडचण म्हणजे त्यांना लस टोचण्यासाठी लांबचा पल्ला गाठवा लागतो. जर त्यांना त्यांच्या स्वत: च्या रुग्णालयात ही लस मिळाली तर ते खूप चांगले होईल.
खासगी रुग्णालयही सक्षम
आमच्याकडे आरोग्य कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि जागा आहे. आम्ही फ्रंटलाइन वर्कर्स असोत किंवा सामान्य लोक सर्वांना लसी देण्यासाठी तयार आहोत. आम्ही फक्त सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहोत. लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये लेखा परिक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे. सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करत, आम्ही लसीकरण करण्यास सक्षम आहोत.
डॉ. गौतम भन्साळी, समन्वय आणि सदस्य खाजगी कोविड रुग्णालय, असोसिएशन ऑफ हॉस्पिटल
युनिट आणि लक्ष्य वाढले, 77% जणांनी घेतला डोस
सोमवारी मुंबईतील 10 लसीकरण केंद्रांवर लसीकरण युनिट्सची संख्या 32 वरून 65 करण्यात आली आहे. यासह, लाभार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, केवळ 77 टक्के आरोग्य कर्मचारी लसी केंद्रांवर पोहोचले. सोमवारी 6500 जणांना लस देण्याचे ठरवले होते. मात्र केवळ 5005 लाभार्थ्यांनी ही लस घेतली.
हेही वाचा- "घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र
एवढ्याना लस मिळाली
केंद्र | 25 जानेवारी | एकूण |
केईएम | 787 | 3117 |
बीडीबीए | 860 | 2985 |
राजावाडी | 679 | 2672 |
नायर | 578 | 2001 |
कूपर | 562 | 2135 |
बीकेसी जंम्बो | 508 | 1788 |
सायन | 459 | 1517 |
वांद्रे भाभा | 447 | 1444 |
व्हीएन देसाई | 55 | 408 |
जेजे | 34 | 145 |
एकूण | 5005 | 18202 |
यातील 10 लोकांमध्ये ताप, शरीरात वेदना यासारखे छोटे दुष्परिणाम दिसून आले आहेत.
------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
bmc can declare private hospitals centers for vaccination frontline workers