"घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र

सुमित बागुल
Tuesday, 26 January 2021

संसदेत दूरगामी परिणाम करणारे कायदे करत असताना दुर्देवाने चर्चा होत नाही. दिल्लीला लाखो शेतकर्‍यांनी वेढा घातला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मार्च काढला गेला. मात्र या मार्चला पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रॅक्टर मार्चला रोखल्यानंतर शेतकरी आणि पोलिस एकमेकांसमोर येऊन आंदोलनाला गालबोट लागलंय. ट्रॅक्टर मार्च रोखल्यानंतर दिल्लीतील वातावरण चांगलंच चिघळलंय.  संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर दगडफेक देखील केली गेली.

दरम्यान दिल्लीतील चिघळलेल्या परिस्थितीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका करत निशाणा साधलाय. 

घटनेचं संरक्षण करावं लागणार...

देशाची मूल्यवान आदर्श घटना, अखंड भारताचं भवितव्य जिच्या हाती आहे, तिला अलिकडच्या सहा वर्षात धक्का लागतोय अशी भीती वाटते. त्यामुळे घटनेचं संरक्षण करावं लागणार आहे. समता हे घटनेचं मुलभूत तत्त्व आहे, तेच काँग्रेसचं तत्त्व आहे. देशात अराजकता निर्माण होतेय, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत. 

REPUBLIC DAY: आपला राष्ट्रध्वज फडकविण्याचे 'हे' नियम तुम्हाला माहिती आहेत का?

मोदी सरकार भांडवलदारांचे काम करणारे सरकार...

पुढे थोरात म्हणालेत की, संसदेत दूरगामी परिणाम करणारे कायदे करत असताना दुर्देवाने चर्चा होत नाही. दिल्लीला लाखो शेतकर्‍यांनी वेढा घातला आहे. मात्र थंडीत या शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ते कसे थकतील ते बघितले गेले. मोदी सरकार भांडवलदारांचे काम करणारे सरकार आहे. 

महत्त्वाची बातमी : देशभक्तीपर वातावरणात डोंबिवली पूर्वेमध्ये 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकला

गोवा विमानाने एक तासावर...

बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील टीका केली. राज्यपालांनी ते गोव्याला जाणार हे शेतकरी संघटनांना कळवले होते, मग याबाबत राजकारण केलं जातंय का? हजारो शेतकरी पायी चालत येतायत हे माध्यमांवर दिसत होतं. एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा गरीब शेतकरी मुंबईत येतोय, तो भेटीची वेळ मागतोय, अशा वेळी राज्यपालांनी वेळ द्यायला हवी होती. गोवा विमानाने एक तासावर आहे. सन्मानीय राज्यपाल आले असते तर ते जास्त शोभून दिसलं असतं. 

delhi tractor rally reaction of maharashtra congress president balasaheb thorat on central government

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi tractor rally reaction of maharashtra congress president balasaheb thorat on central government