महाविकासआघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना BMC निवडणुकीत आमने सामने? कॉंग्रसचा स्वबळाचा नारा

महाविकासआघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना BMC निवडणुकीत आमने सामने? कॉंग्रसचा स्वबळाचा नारा

मुंबई  ः महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत युती करावी, अशी मागणी होत असली तरी वर्षभराने होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रसंगी शिवसेनेशीही दोन हात करण्याची प्रचारप्रमुख नसीम खान यांची तयारी आहे. या महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. 

आम्ही मागीलवर्षी सरकारमध्ये लेखी स्वरुपातील किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सहभागी झालो आहोत. त्याचा आगामी महापालिका निवडणुका कशा प्रकारे लढवाव्यात याच्याशी काहीही संबंध नाही. महत्वाचे म्हणजे मुंबईचा विकास हाच पक्षाचा ध्यास आहे. 1997 पासून महापालिकेत सत्तेवर असलेले शिवसेना व भाजप हे दोनही पक्ष शहरवासियांना सुविधा न मिळण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे ध्येय आहे, असे खान यांनी सकाळ ला सांगितले. 

मुंबईतील शहरवासियांच्या समस्या वेगळ्या आहेत तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरवासियांच्या समस्या वेगळ्या आहेत. या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या ठराविक कालावधीत सोडविण्याचा रोडमॅप तयार केला जाईल. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यावर आमचा मुख्य भर राहणार आहे. आम्ही राज्य सरकारमध्ये शिवसेनेचे सहकारी असलो तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडविण्याबाबत, त्यांना सोयी मिळण्याबाबत आम्ही कसलीही तडजोड करणार नाही. त्यासाठी आम्ही भांडणारच, अशा शब्दांत त्यांनी प्रसंगी महापालिकेत शिवसेनेशीही दोन हात केले जातील, असे सूचित केले. 

मुंबईत नागरी सुविधांचा अभाव असून शहराचा विकास थांबला आहे, यामुळे मुंबईकरांमध्ये रोष आहे. अनेक वर्षे ही समस्या असल्यामुळे त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करू. शहरातील सर्वच लोकांना नागरी सोयीसुविधा मिळणे अत्यावश्यक आहे, मुंबईचा आणखी विकास होण्याची गरज आहे. त्यामुळे शहराचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ, असेही नसीम खान यांनी सांगितले. 

दुसरे म्हणजे महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल. पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांची हीच इच्छा असल्याने तिचा मान ठेवला जाईल. त्यासाठी आमची तयारीही सुरु झाली आहे, असेही खान म्हणाले.

in BMC election Congress against Shiv Sena? Congress will contest municipal elections on its own

---------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com