प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भाग्यश्री भुवड
Tuesday, 22 December 2020

राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.

 

मुंबई  : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, राज्य टास्कफोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी आदी उपस्थित होते.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गाफील राहून चालणार नाही - 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवा, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

रात्री संचारबंदी लागू - 

आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहन करतानाच आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवाशी देशांतर्गत प्रवास करुन महाराष्ट्रात येतात. विविध राज्यातून येणाऱ्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

उन्हाळा-पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकलो. आता हिवाळ्यात सर्दी-पडसे, ताप-खोकला असे साथीचे आजार वाढले आहे. हे लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांवर अधिक भर द्यावा. त्यासाठी राज्यात असलेल्या कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावाही घेतला. यात लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यात ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा संकलित करून तो पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था, प्रशिक्षण आदी गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा टास्कफोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देतानाच नॉन कोविड रुग्णांकडेही लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मास्क वापरल्याने कोरोना विषाणूचा मग तो जुना असो की त्याच्या प्रसाराला खुप मोठ्याप्रमाणात प्रतिबंध होतो. त्यामुळे राज्यातील जनतेला मास्क वापरण्यासाठी बंधनकारक करावे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मास्क लावा, हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा ही त्रिसुत्री अंमलात आणणे कसे गरजेचे आहे याबाबत लोकांमध्ये नव्याने जागृती करा. त्यांना धोक्याची जाणीव करून द्या, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

महाड रायगड मार्गावर भरधाव कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

सर्व्हिलन्स अधिक वाढवावा -

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, नवीन विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सर्व्हिलन्स अधिक वाढवावा. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवतानाच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विभागीय आयुक्तांनी कोरोना उपाययोजना आणि लसीकरण कार्यक्रम तयारीची माहिती यावेळी दिली.
govt bodies should be vigilant and increase the number of tests CMs instructions

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: govt bodies should be vigilant and increase the number of tests CMs instructions