सेनेचा दणका: संजय निरुपमांचा राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार व कॉंग्रेस मुंबई समितीचे अध्यक्ष संजय निरुपम या नेत्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्‍वभूमीवर राजीनामा देऊ केला आहे

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने मिळविलेल्या यशामुळे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय निरुपम यांनी पदाचा राजीनामा दिला. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षास तब्बल 52 जागा मिळविण्यात यश आले होते. यामुळे कॉंग्रेस पालिकेतील दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला होता. मात्र या निवडणुकीच्या ताज्या "ट्रेंड'नुसार कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार केवळ 22 जागांवर आघाडीवर दिसत आहेत. या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत अखेर निरुपम यांनी राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसमधील यासंदर्भातील अंतर्गत राजकारणही गेल्या काही दिवसांत उफाळून वर आल्याचे दिसून आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत व निरुपम यांच्या समर्थकांमधील संघर्षामुळे कॉंग्रेसमधील मतभेद वेगाने रुंदावल्याचे स्पष्ट झाले होते. याचबरोबर, कामत यांच्यासह अन्य महत्त्वपूर्ण कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनीही पक्षाच्या महानगरपालिकेमधील प्रचारापासून अंतर राखले होते. या पार्श्‍वभूमीवर, निरुपम यांनी हा राजीनामा दिला आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष असलेल्या शेलार यांनीही पक्षाची अपेक्षित कामगिरी न झाल्याचे मान्य करत राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. शिवसेना व भाजप यांच्यामधील संघर्ष सीमेला जाऊन पोहोचल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईमधील ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. शेलार यांच्यासहच पक्षाचे अन्य नेते किरीट सोमय्या यांनीही या निवडणुकीमधील प्रचारादरम्यान सातत्याने सेनेस लक्ष्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर, भाजपची मुंबईमधील कामगिरी याआधीच्या तुलनेत चांगली झाली असली; तरी सेनेस पराजित करण्यात यश न आल्यामुळे शेलार यांनीही राजीनामा देऊ केल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: BMC Elections Results 2017: Sanjay Nirupam takes responsibility for Congress poor show, offers resignation