मुंबईत लहान मुलांचा कोविड संसर्ग नियंत्रणात; डेल्टा व्हेरियंटचे 75% रुग्ण |Delta variant update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children corona

मुंबईत लहान मुलांचा कोविड संसर्ग नियंत्रणात; डेल्टा व्हेरियंटचे 75% रुग्ण

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने (bmc) जिनोम सिक्वेसिंगचा (Genome Sequencing) चौथ्या टप्प्याचा अहवाल (fourth level report) जाहिर केला आहे. या चौथ्या टप्प्यात मुंबई महापालिकेने लहान मुलांमधील संसर्गावर (children corona) लक्ष केंद्रीत केले आहे. पालिकेने जिनोम सिक्वेसिंगसाठी लहान मुलांचेही नमुने गोळा केले होते. पालिकेने मुंबईतून घेतलेल्या 281 रुग्णांपैकी 19 जण 18 वर्षांखालील होते. त्यापैकी, 11 जणांना ‘डेल्टा व्हेरियंट’ (Delta variant) आणि 8 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ (Delta derivative) प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. म्हणजेच तुलनेने बालक आणि लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

हेही वाचा: लसीकरण करूनही झालेला संसर्ग दिशादर्शक ठरणार; BMC कडून प्रकरणांचा अभ्यास

दरम्यान, चौथ्या टप्प्यातही डेल्टा व्हेरियंट’चे 75 टक्के आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 25 टक्के रुग्ण आढळून आल्याचे पालिकेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. तर, नमुने घेतलेल्यांपैकी लस न घेतलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचे या अहवालाच्या निरीक्षणातून समोर आले आहे. आतापर्यंत तीन वेळा जिनोम सिक्वेसिंग करण्यात आले असून एकदाही डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग मुंबईत असल्याचा निर्वाळा पालिकेकडून देण्यात आलेला नाही. तीन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता चौथ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकूण 345 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

यातील 281 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. मुंबईतील 281 रुग्णांपैकी 26 रुग्ण (9 टक्के) हे 0 ते 20 वर्षाखालील आहेत. 21 ते 40 वर्षे वयोगटात 85 रुग्ण (30 टक्के), 41 ते 60 वर्षे वयोगटात 96 रूग्ण (34 टक्के), 61 ते 80 वयोगटात 66 रुग्ण (23 टक्के) आणि 81 ते 100 वयोगटातील 8 रुग्ण (3 टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत. चाचणीतील निष्कर्षानुसार, 281 पैकी 210 रुग्ण (75 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर 71 रुग्ण (25 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: CSR उपक्रमांतर्गत एंडोस्कोपी सेवा; गरजू रुग्णांसाठी प्रगत चाचण्या

डेल्टा व्हेरियंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरियंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह विषाणू संक्रमण, प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

कोविड लसीकरण झालेल्या 281 पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त 8 जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त 21 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. तसेच कोणाचाही मृत्यू ओढवला नाही. याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या 69 नागरिकांना बाधा झाली. त्यातील 12 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील चौघांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. तिघांना अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर चार जणांचा मृत्यू ओढवला आहे.

loading image
go to top