esakal | BMC कडे कोव्हिशिल्डचे इतके लाख डोस, मुंबईकरांना उद्या मिळेल लस

बोलून बातमी शोधा

Covishield Vaccine
BMC कडे कोव्हिशिल्डचे इतके लाख डोस, मुंबईकरांना उद्या मिळेल लस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लसीची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद झाली. ही सर्व बंद झालेली केंद्रे सोमवारपासून पुन्हा कार्यरत केली जाणार असून पालिकेकडून शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांनाही लसीचे डोस दिले जाणार आहेत.

रविवारी संध्याकाळी पालिकेला दीड लाख कोव्हिशिल्ड लसीचे डोस मिळाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.  मुंबई सेंट्रल येथील केंद्रातून हे डोस उपलब्ध झाले असून पालिका आणि खासगी लसीकरण केंद्रात उद्यापासून कोव्हिशिल्डचा डोस घेता येणार आहे.

सोमवारपासून सर्व केंद्रांवर कोरोनाची लस मिळू शकेल असेही सांगण्यात आले आहे. रविवारी लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ 37 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती, त्यामध्ये 7 खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश होता. या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध डोसनुसार लाभार्थ्यांना दुसर्‍या डोससाठी प्राधान्य दिले जात होते. यामुळे रविवारी अनेक लाभार्थ्यांना लसीविना केंद्रांकडून परत पाठवण्यात आले. पण, सोमवारी लाभार्थ्यांना या समस्येला पुन्हा सामोरे जावे लागणार नाही.

हेही वाचा: Virar Fire: ...तर त्या 15 जणांचा जीव वाचला असता!

पालिकेला रविवारी संध्याकाळी दीड लाखाहून अधिक डोस मिळाले  असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. हे डोस सर्व केंद्रांमध्ये पुरविले जातील, जेणेकरून सर्व केंद्रे सोमवारपासून कार्यान्वित होतील असेही त्यांनी साांगितले.

हेही वाचा: मुंबईकरांनो, कोकणतील हापूस आंब्याबद्दलची ही बातमी वाचाच

दरम्यान, 132 लसीकरण केंद्रांपैकी 37 लसीकरण केंद्रांवर लसीचा दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले गेले असेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर, कोव्हॅक्सिनचा मर्यादित साठा असून फक्त काहीच केंद्रांवर या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.