टीएमटी स्थानकावर बीएमसीचा हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) मुलुंड येथील वाहतूक नियंत्रण चौकी व प्रवासी स्टॅण्डवर बृहन्मुंबई महापालिकेने (बीएमसी) हातोडा मारल्याने गेल्या दोन दिवसांपासून टीएमटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची हेळसांड होत आहे. 

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) मुलुंड येथील वाहतूक नियंत्रण चौकी व प्रवासी स्टॅण्डवर बृहन्मुंबई महापालिकेने (बीएमसी) हातोडा मारल्याने गेल्या दोन दिवसांपासून टीएमटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची हेळसांड होत आहे. 

रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली सध्या बृहन्मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाई सुरू असल्याने इतर बेकायदा अनधिकृत बांधकामांना वगळून केवळ टीएमटीच्या चौकीला लक्ष्य केल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, ठाणे आणि मुंबई महापालिकेत सत्ता किंबहुना राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असतानाही अशा प्रकारे कारवाई झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा ः सुट्टीमुळे नागरिकांची प्रदूषणातून सुटका
 प्रवाशांच्या सोईसाठी टीएमटी प्रशासनाने मुलुंड (पश्‍चिम) स्थानकानजीकच्या जेएसडी (एसीसी सिमेंट रोड) रस्त्यावरील पदपथानजीक छोटेखानी वाहतूक नियंत्रण चौकी आणि तात्पुरते बस थांबे उभारले होते. बृहनमुंबई महापालिकेने पदपथ सुधारणा व रस्तारुंदीकरण करण्याच्या नावाखाली जेएसडी रस्त्यावरील चौकीवर आणि बसथांब्यावर नुकतीच तोडक कारवाई केली. त्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे. या संदर्भात, टीएमटी एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बीएमसीकडे जाब विचारला असता, आता यावर सारवासारव सुरू आहे. तसेच, येत्या पंधरा दिवसांत पुन्हा हा बसथांबा व नियंत्रण चौकी उभारून देण्याचे सांगितले जात आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि ठाणे व मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता असताना अशा प्रकारे टीएमटीच्या नियंत्रण चौकीवर बीएमसीकडून हातोडा मारण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे बेस्ट बसेससाठी ठाण्यातील टीएमटी थांब्यावर अथवा काही ठिकाणी स्वतंत्र बस थांबे बेस्ट बसेससाठी उभारून देण्यात आले आहेत. तरीही, मुलुंड येथील टीएमटीच्या थांब्यावर कारवाई केल्याने ठाणेकरांमध्ये संताप आहे. तेव्हा, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी टीएमटी कर्मचारी करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC hammer at TMT station