कोळीवाड्यापाठोपाठ बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरबंदी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

वरळी कोळीवाड्यापाठोपाठ आता बीडीडी चाळींचा परिसर सील करण्यात येणार आहे. वरळी आणि ना. म. जोशी मार्गावरील 120 हून अधिक बीडीडी चाळी सील करण्यात येणार आहेत.

मुंबई : कोरोनाविरोधी युद्धातील वरळी कोळीवाडा पॅटर्नची चर्चा सुरू असताना बीडी़डी चाळींच्या परिसरात रुग्ण वाढू लागले आहेत. या भागात आतापर्यंत 70 कोरोनाबाधित आढळले आहेत. अशा परिस्थितीतही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणे कमी केलेले नाही. वारंवार सूचना देऊनही ज्येष्ठ नागरिकही घराबाहेर पडतात. त्यावर उपाय म्हणून वरळी कोळीवाड्यापाठोपाठ आता बीडीडी चाळींचा परिसर सील करण्यात येणार आहे. वरळी आणि ना. म. जोशी मार्गावरील 120 हून अधिक बीडीडी चाळी सील करण्यात येणार आहेत.

मोठी बातमी ः कोरोनावर लस येण्याची शक्यता धुसर? चिंता वाढवणारा अहवाल

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी व्हिडीओच्या माध्यमातून बीडीडी चाळींमधील रहिवाशांना घरातच राहण्याचे आवाहन केले. वरळीत 121 बीडीडी चाळी आहेत. चाळीतील प्रत्येक मजल्यावर 20 खोल्या आहेत. या वसाहतीत 10 हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे. परिसरात सामाजिक अंतर पाळले जात नाही. रस्ते, मैदाने, चाळींच्या गच्चीवरही घोळके असतात त्यामुळे हा परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. ना. म. जोशी मार्गावर 30 बीडीडी चाळी आहेत. येथेही 20 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तेथेही वरळी बीडीडी परिरासारखीच परिस्थिती आढळते.

मोठी बातमी ः ..आणि आई म्हणाली, मी पाया पडते तु नको जाऊ !

ड्रोनद्वारे सात दिवस नजर
बीडीडी वसाहतीत पुढील सात दिवस घरबंदीसारखी परिस्थिती असेल. रहिवाशांनी घराबाहेर पडू नये म्हणून ड्रोनद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. या परिसरातील फक्त औषधांची दुकाने सुरू ठेवण्याचा विचार आहे. इमारतीबाहेर एखादी व्यक्ती दिसल्यास पोलिस कारवाई होऊ शकते.

मोठी बातमी ः लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

850 हून अधिक रुग्ण 
वरळी-प्रभादेवी परिसरात आतापर्यंत कोरोनाचे 850 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 50 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 305 जण बरे झाले आहेत.

लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. नागरिकांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- किशोरी पेडणेकर, महापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc planned to seal bdd chawl amid corona outbreak