esakal | 'BMC' शाळांची दुरावस्था; अन् केंब्रिजचा पेंग्विन कशाला ? भाजपची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Pratik karpe

'BMC' शाळांची दुरावस्था; अन् केंब्रिजचा पेंग्विन कशाला ? भाजपची टीका

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिका शाळांमधील (BMC School) मुलांना दर्जेदार शिक्षण (education) मिळत नाही, राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (National Education policy) विभागाने तयारी केली नाही, अन अशा स्थितीत केंब्रिज बोर्डाच्या (Cambridge Board) महापालिका शाळा सुरु करण्याचा अट्टाहास कशाला, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव प्रतीक कर्पे (Pratik karpe) यांनी केली आहे.

हेही वाचा: मागाठाणे वनविभागातील नागरिकांना घरगुती दराने वीज पुरवठा; उर्जामंत्र्यांचे निर्देश

महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात केंब्रिज बोर्डाची महापालिका शाळा उभारण्याचा संकल्प नुकताच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. मात्र शहरातील महापालिका शाळांची प्रचंड दुरवस्था झालेली असताना हा केंब्रिजचा पेंग्विन कशाला अशी टीका त्यावर कर्पे यांनी केली आहे. परदेशातून भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात आणलेले पेंग्विन आता पांढरा हत्ती ठरत असल्याची टीका आता होत आहे.

त्यामुळे तशीच गत या महापालिकेच्या केंब्रिज बोर्ड शाळांची होऊ नये, या भूमिकेतून महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य कर्पे यांनी ही टीका केली आहे. अजून नवीन “राष्ट्रीय शिक्षण धोरण”वर पालिकेच्या शिक्षण विभागाने तयारी केली नाही. ते सोडून एवढी मोठी उडी घेणे महापालिकेला जमेल का, असेही त्यांनी विचारले आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कारभार चालत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी, बसण्यासाठी बाके, शौचालय इत्यादी मूलभूत सुविधा मिळत नाहीत.

हेही वाचा: Sakal Impact: कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याची KDMC कडून तातडीने डागडुजी

अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहाची पुरेशी सोयही नाही. पालिकेच्या शाळांकडे कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा सोयी नसल्याचेही दिसून आले. अशा स्थितीत मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात एक केंब्रिज बोर्ड शाळा उघडण्याची कल्पना हास्यास्पद आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवण्यासाठी केलेली ही फुकटची घोषणा आहे. यामुळे मुलांना काहीही फायदा होणार नाही, असेही कर्पे यांनी दाखवून दिले आहे.

मुंबई महापालिकेची शिक्षणासाठीची वर्षभराची तरतूद तीन हजार कोटी रुपये आहे. एवढी वर्षे शिवसेना सत्तेत असताना हजारो कोटी रुपये शिक्षणावर जर पारदर्शकपणे खर्च झाले असते तर आजपर्यंत जागतिक दर्जाचे शिक्षण मुंबईकरांना नक्कीच देता आले असते, असा टोलाही कर्पे यांनी लगावला आहे. या सगळ्या “हवाई संकल्पना” मुंबईकरांच्या हक्काच्या निधीतून करू नयेत, त्यासाठी सरकारने किंवा प्रायोजकांनी वेगळा निधी द्यावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

loading image
go to top