महापालिकेला तगडी सुरक्षा?

सुजित गायकवाड 
बुधवार, 12 एप्रिल 2017

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कडेकोट सुरक्षेसाठी नवे सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसार सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक परत पाठवून त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक मागवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे हे सुरक्षारक्षक प्रशिक्षित व खाकी वर्दीतील बंदुकधारी आहेत. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा अधिक बळकट होईल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कडेकोट सुरक्षेसाठी नवे सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसार सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक परत पाठवून त्याऐवजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक मागवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे हे सुरक्षारक्षक प्रशिक्षित व खाकी वर्दीतील बंदुकधारी आहेत. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा अधिक बळकट होईल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

दिघा ते बेलापूर असा व्याप सांभाळणाऱ्या नवी मुंबई महापालिकेची मुख्यालयाची इमारत दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. तेव्हापासून मुख्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता; परंतु त्यानंतरही मुख्यालयाच्या सुरक्षेत तसूभरही बदल केला नव्हता; परंतु वाढता व्याप, नागरिकांचा राबता आणि भविष्यातील धोका लक्षात घेऊन महापालिकेने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंळाचे प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिका मुख्यालय, वाशी रुग्णालय, महापौर आणि आयुक्त निवासस्थान या ठिकाणचे त्यासाठी सर्वेक्षण केले आहे. यासाठी १६९ सुरक्षारक्षकांची गरज असल्याचे महामंडळाने पालिकेला सांगितले आहे. त्यात मुख्यालयासाठी ६२ सुरक्षारक्षक असून यातील सहा जण सशस्त्र असतील. रुग्णालयात डॉक्‍टरांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन वाशी रुग्णालयात ७७ सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यात सहा बंदुकधारी असतील. महापौर व आयुक्त निवासस्थानावर अनुक्रमे १५ पैकी तीन बंदुकधारी रक्षक नेमण्याचे प्रस्तावित आहे. सध्या सुरक्षा मंडळाचे ४४७ सुरक्षारक्षक आहेत. त्यातील ३४ जणांवर मुख्यालयाच्या इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. महापौर व आयुक्तांच्या निवासस्थानी खासगी सुरक्षा संस्थेची सुरक्षा आहे; परंतु सुरक्षा मंडळाचे रक्षक महापालिका मुख्यालय व सरकारी इमारतींसाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे नवी आव्हाने लक्षात घेऊन प्रशिक्षित रक्षक गरजेचे असल्याचा विचार प्रशासनाने केला आहे. महामंडाळातील सुरक्षारक्षक पोलिस व सैन्यातील निवृत्त प्रशिक्षित अधिकारी असल्याने त्यांना एखादा प्रसंग उद्‌भवल्यास तो निपटण्याचे ज्ञान असते. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा अधिक कडक होईल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे. महापालिका मुख्यालयाच्या इमारतीमधील अनेक बाबी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.  

कारवाईसाठी बंदुकधारी रक्षक
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला कारवाईसाठी अनेकदा पोलिसांच्या सुरक्षा पथकावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कारवाईत दिरंगाई होत असते. मात्र महापालिकेला स्वतंत्र बंदुकधारी सुरक्षारक्षक मिळाल्यावर त्यातील काही सुरक्षारक्षक अतिक्रमणविरोधी विभागाला कारवाईसाठी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. 

महापालिका मुख्यालयासह इतर सरकारी इमारतींच्या सुरक्षारक्षकांमध्ये बदल व्हावेत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. महासभेच्या मंजुरीनंतर त्यावर कार्यवाही होईल.
- अकुश चव्हाण, अतिरिक्‍त आयुक्त

Web Title: BMC security