#BMCissues केईएम शवागाराची हॉरर स्टोरी

नेत्वा धुरी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई, ता. २७ : परळच्या केईएम रुग्णालयात मेडिसीन युनिटमधील रसायने बाथरूममध्ये ठेवण्याचा प्रकार उजेडात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शवागाराच्या अतिगंभीर स्थितीकडेही लक्ष वेधले जात आहे. शवागारातील काही भाग तर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. अनेक टेकूंचा आधार देण्यात आला असल्याने शवविच्छेदन करणारे डॉक्‍टर आणि कर्मचारी जीव मुठीत धरून आहेत.

रक्तपेढीजवळच्या भागातील तळमजल्यावर केईएमचे शवागार आहे. सुमारे १८०० चौरस फुटांच्या जागेतील बांधकाम जुने झाल्याने ठिकठिकाणी गळती सुरू असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले. शवविच्छेदन विभागाची वरची भिंत कोसळण्याची भीती असल्याने त्याखाली खबरदारी म्हणून हिरव्या रंगाची जाळी लावण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी गळती होत आहे. 

मृतदेह ठेवण्याच्या शीतगृहातही अशीच दुरवस्था आढळून आली. शवागारात दोन शीतगृहे आहेत. दोन्ही ठिकाणी गळतीमुळे भिंतींची अवस्था फारच वाईट झाली आहे. काही मृतदेह जागेअभावी, पुरेशा शवपेट्या नसल्याने या खोलीत उघड्यावर ठेवलेले असतात. त्यावरील बांधकामही गळतीने खराब झाले आहे. 

मृतदेह आणण्यासाठीच्या जागेत गळती सुरू असल्याने शवागारातला हा विभाग आता प्रथमदर्शनी भागात हलवण्यात आला आहे. या जागेत अनेक टेकूंचा आधार दिलेला आहे; पण बांधकामाचे साहित्य कुठेही दिसून आले नाही. 

केईएमच्या शवागाराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठीच काही भागांत टेकू लावलेले आहेत. दोन-तीन महिन्यांत काम पूर्ण होईल. 
-डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय संचालक, पालिका वैद्यकीय रुग्णालये आणि पालिका रुग्णालये

Web Title: BMCissues Kem deadbody house Horror Story