मुंबई महानगरपालिकेच्या 'मिशन सेव्ह लाईव्हज' मुळे कोविड मृत्यूदर कमी करण्यास मदत - काकाणी

भाग्यश्री भुवड
Friday, 25 September 2020

मुंबईतील बेड्सची संख्याही समाधानकारक - काकाणी

मुंबई, 25 : मुंबईत कोविड 19 च्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दोन महिन्यात मृत्यू दरात घट झाली आहे. जूनमध्ये 5.8  टक्के असलेल्या कोविड मृत्यूदरात घट होऊन तो आता 4.5 टक्के इतका झाला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी ‘मिशन सेव्ह लाईव्ह्ज’ मुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे. 

'मिशन सेव्ह लाईव्हज' अंतर्गत प्रत्येक रुग्णालयातील गंभीर रुग्णांची एक स्वतंत्र यादी तयार केली जाते आणि त्यांच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवले जाते असे काकाणी यांनी सांगितले. दररोज, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉक्टरांशी दोनदा सल्लामसलत केली जाते, टास्क फोर्सच्या सदस्यांमार्फत तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो आणि गंभीर रुग्णांची सतत व्हिडिओच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. या मोहिमेचा एक भाग म्हणून, प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या सेवांसह अत्याधुनिक व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आले. त्यांनी मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली" असे काकाणी यांनी स्पष्ट केले. 

महत्त्वाची बातमी : राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

मुंबईत कोविड रुग्णांच्या घटना मोठ्या प्रमाणात नोंदवल्या जात असल्या तरी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स तसेच शाळा आणि महाविद्यालये वगळता आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे बहुतेक सेवा व व्यवसाय संस्था सुरू झाल्या असून लोकांची वर्दळ वाढली आहे. पालिकेने चाचणीत 90 टक्के वाढ केली असून त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे ही त्यांनी सांगितले. 

मुंबईतील बेडची उपलब्धता समाधानकारक असून 17 हजार 500 कोविड बेडपैकी जवळपास 5500 बेड रिक्त आहेत. तसेच, मुंबईत 8800 ऑक्सिजन बेड आणि 1100 व्हेंटिलेटर बेडपैकी जवळपास 10 टक्के बेड रिक्त आहेत, असे काकाणी यांनी नमूद केले.

महत्त्वाची बातमी :  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं ट्विट का डिलीट केलं ? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रभावी आरोग्य सेवा शिकवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" हे थेट संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा सुरू असून दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक बाबींची माहिती घेऊन त्यानंतर त्यावर उपचार केले जाणार आहेत. 

यामध्ये कोविड रुग्णांव्यतिरिक्त किडनी संबंधातील तक्रारी, हायपर टेन्शन, मधुमेह अशा इतर आजारांवरही रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार देता यावेत आणि भविष्यातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची तसेच उपचारांसंदर्भातील धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करता यावेत हा या योजनेचा उद्देश आहे असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

BMCs mission save lives helped to decrease death rate in mumbai city


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMCs mission save lives helped to decrease death rate in mumbai city