उत्तरपत्रिका तपासण्याच्या पद्धतीवर बोर्डाची नजर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई - दहिसरमधील एका विद्यालयातून चोरीला गेलेल्या दहावीच्या उत्तरपत्रिका पोलिसांना सापडलेल्या नाहीत. त्यातच एका शिक्षकाने विलेपार्लेतील उपहारगृहात उत्तरपत्रिका तपासल्याचे निदर्शनास आले होते.

मुंबई - दहिसरमधील एका विद्यालयातून चोरीला गेलेल्या दहावीच्या उत्तरपत्रिका पोलिसांना सापडलेल्या नाहीत. त्यातच एका शिक्षकाने विलेपार्लेतील उपहारगृहात उत्तरपत्रिका तपासल्याचे निदर्शनास आले होते.

अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाने भरारी पथकांना आता उत्तरपत्रिका तपासणीचे केंद्र असलेल्या शाळांनाही भेटी देण्याचे आदेश दिले आहेत. या केंद्रांतील उत्तरपत्रिका तपासण्याच्या पद्धतीवर आता नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती मुंबई विभागीय बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.

या तपासणी केंद्रांमध्ये उत्तरपत्रिकांची तपासणी कशी होते, शिक्षक उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जात आहेत का, यावर भरारी पथकाचे लक्ष असेल. दहिसरच्या घटनेतील उत्तरपत्रिकांचा शोध आठवड्याभरात न लागल्यास संबंधित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही जगताप म्हणाले.

90 टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण
बारावीच्या 20 लाख उत्तरपत्रिकांपैकी 19 लाख (90 टक्के) उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे जमा झाल्या आहेत. उर्वरित एक लाख उत्तरपत्रिका दोन दिवसांत जमा होतील. दहावीच्या 50 टक्के उत्तरपत्रिका तपासून आल्या आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: board watch on answer paper cheaking process