वाशी गावातील नाल्यात पेटीत महिलेचा मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

वाशी गाव येथील कोरड्या नाल्यामध्ये बुधवारी सकाळी पत्र्याच्या पेटीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गालगत वाशी गाव येथील कोरड्या नाल्यात बुधवारी (ता. 2) सकाळी पत्र्याच्या पेटीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून, मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

वाशी गाव येथील कोरड्या नाल्यामध्ये बुधवारी सकाळी पत्र्याच्या पेटीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपासणीत मृत महिला अंदाजे 30 ते 35 वयोगटातील असून, तिच्या अंगावर भाजल्याच्या जखमा आढळल्या आहेत. मारेकऱ्याने अंगावर गरम पाणी अथवा ऍसिडसारखा पदार्थ टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

महिलेचा चेहरा व शरीर भाजले असल्याने चेहरा विद्रूप झाला आहे. त्यामुळे ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. हत्या 48 तासांपूर्वी स्कार्फने गळा आवळून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. या घटनेतील मृत महिलेच्या हातामध्ये काळ्या रंगाच्या पांढरी डिझाईन असलेल्या दोन बांगड्या व स्टीलचे कडे, गळ्यात काळ्या व लाल मण्याची माळ, तर अंगामध्ये लाल-पांढरे ठिपक्‍यांची डिझाईन असलेला काळ्या रंगाचा कुर्ता व केशरी रंगाची सलवार आहे. या वर्णनाच्या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी तत्काळ वाशी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशी पोलिस ठाण्याने केले आहे. 

मृतदेहाशिवाय पेटीत आढळलेल्या वस्तू 

पेटीमध्ये काळ्या रंगाचा मोठा ऍप्रन, सफेद रंगाचा छोटा टॉवेल, फुल बाह्यांचा हिरव्या-पांढऱ्या पट्ट्यांचा टी-शर्ट, कार्गो हाफ पॅंट, ब्लाऊज व सहावारी साडी, फुल बाह्यांचे जर्कीन, सोन्याच्या दुकानात मिळणारा लाल रंगाचा रिकामा पाऊच, रंगीबेरंगी चौकटीच्या डिझाईनचा बेडशिटचा तुकडा, लेडीज चप्पल जोड, दोन स्टीलची कुलपे, काळ्या रंगाचा सॉक्‍सचा जोड, पांढऱ्या-गुलाबी रंगाची बेडशिट आणि स्कार्फ, आदी कपडे व इतर वस्तू आढळून आल्याचे लांडगे यांनी सांगितले. 
 

Web Title: The bodies of the woman in a stove in Vashi village