नियम मोडाल तर दंडुका बसणार...!

file photo
file photo

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडून सर्रास बेशिस्त वर्तन करणाऱ्या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी लवकरच वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी (ता. 3) मुंबई उच्च न्यायालयाला दिली. विशेष म्हणजे बेकायदा पार्किंगवर कारवाई करणाऱ्या टोईंग व्हॅन ठेवण्यासाठीच पुरेशी जागा उपलब्ध नसल्याची कबुलीही सरकारने दिली आहे.

टोईगबाबत वाहतूक पोलिस विभागात करण्यात आलेल्या सुधारणा आणि जनजागृती मोहिमांची माहिती देणारे सविस्तर प्रतिज्ञापत्र मार्च 2018 मध्ये राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक चौक्‍यांबाहेर ठेवण्यात आलेल्या जुन्या, मोडकळीस आलेल्या गाड्यांचा ढीगही हटवण्यात येणार आहे. ही वाहने प्रशासनाच्या डम्पिंग यार्डवर हलवण्याच्या पर्यायाबाबत विचार सुरू असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. 

पोलिस सेवेतील सुनील टोके यांनी केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी न्या. रणजीत मोरे आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वाहतूक पोलिस विभागाने केलेल्या कारवाईची आकडेवारी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात दाखल केली. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर ऑक्‍टोबर 2016 च्या आकडेवारीनुसार ई-चालानद्वारे कारवाई करून सुमारे 9 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बेशिस्त वाहनचालकांना सुमारे 9 लाख 30 हजार ई-चलान पाठवण्यात आली, असे राज्य सरकारने नमूद केले आहे.

मुंबईत 5408 सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. बस, ट्रक आदी अवजड वाहनांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. जानेवारी 2017 पासून पूर्व मुक्त मार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मरिन ड्राईव्ह येथे 32 स्पीडगन कॅमेरे बसवण्यात आले. प्रत्येक वाहतूक चौकीला महिन्याला दोन जागांवर चोख कारवाई करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दादर, कुर्ला, बोरिवली, सीएसएमटी या ठिकाणीही तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. यापूर्वी दाखल केलेल्या मार्च 2018 च्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली. 

पोलिसांवरही कारवाई 
बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधात नागरिकांनी complaint.mumtraffic@mahapolice.gov.in या ई-मेल पत्त्यावर तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहतूक पोलिसांच्या विरोधात आलेल्या तक्रारींवरही कारवाई करण्यात आली आहे. तेरा जणांची बदली केली असून, दोघांना निलंबित केले आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com