सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा, बुधवारपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

सुनीता महामुणकर
Monday, 11 January 2021

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सोनू सूदला येत्या 13 जानेवारीपर्यंत दिलासा दिला आहे.

मुंबई: निवासी इमारतीमध्ये नियमांचे उल्लंघन करुन बेकायदेशीर आलिशान हॉटेल सुरू केल्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सोनू सूदला येत्या 13 जानेवारीपर्यंत दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत मुंबई महापालिकेने कठोर कारवाई करु नये, हा दिंडोशी न्यायालयाचा आदेश न्यायालयाने बुधवारपर्यंत कायम ठेवला आहे.

जुहूमधील 6 मजली इमारतीमध्ये परवाना शिवाय हॉटेल सुरु केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे आणि सोनू यांना नोटीसही बजावली आहे. या विरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे आज याचिकेवर सुनावणी झाली. इमारतीमध्ये कोणतेही नियमबाह्य बांधकाम केले नाही असा युक्तिवाद सूद यांच्या वतीने एड अमोघ सिंह यांनी केला. मात्र ज्येष्ठ विधीज्ञ अनिल साखरे यांनी या विधानाचे खंडन केले. सोनूने अधिकृत परवानगी न घेता निवासी इमारतीमध्ये 24 खोल्यांचे हॉटेल सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले. यावर ते हॉटेल नसून खोल्या भाड्याने देण्यात येतात असा खुलासा सिंह यांनी केला. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्ही परवाना न घेता हॉटेल सुरु केले का, असा प्रश्न न्या चव्हाण यांनी विचारला. तुम्ही न्यायालयात स्वच्छ हेतूने यायला हवे. अन्यथा त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

सोनूला 2018 आणि 2020 मध्ये नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र तरीही कारवाई न केल्यामुळे महापालिकेने पोलिस फिर्याद केली आहे. याप्रकरणी पाडकामाची कारवाई होऊ शकते या हेतूने सोनूने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. महापालिकेला कारवाई करण्यास मनाई करावी अशी मागणी त्याच्या वतीने एड सिंह यांनी केली. मात्र महापालिकेने याबाबत असमाधान व्यक्त केले. त्यामुळे न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत कठोर कारवाई करण्यास मनाई करण्याचा दिंडोशी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. बुधवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा- कंगना राणावतला दिलासा, समन्स बजावण्यास तूर्तास पोलिसांना मनाई

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay High Court Sonu Sood illegal structural suburban Juhu relief January 13 BMC alleged


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay High Court Sonu Sood illegal structural suburban Juhu relief January 13 BMC alleged