
कंगना राणावत विरोधात येत्या 25 जानेवारीपर्यंत कठोर कारवाई करु नये आणि समन्सही बजावू नये,असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना आज दिले.
मुंबई: वादग्रस्त ट्विट केल्याच्या प्रकरणात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली अभिनेत्री कंगना राणावत विरोधात येत्या 25 जानेवारीपर्यंत कठोर कारवाई करु नये आणि समन्सही बजावू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना आज दिले. त्यामुळे पुन्हा कंगना आणि तिच्या बहिणीला दिलासा मिळाला आहे.
मुंबई पोलिस आणि पाकव्याप्त काश्मीर बाबतीत ट्विटरवर कंगनाने काही आक्षेपार्ह ट्विट केली आहेत अशी फौजदारी फिर्याद एड यांनी वांद्रे न्यायालयात केली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी कंगना आणि तिच्या बहिणीने न्यायालयात याचिका केली आहे. न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. पोलिस या प्रकरणात चौकशी करीत आहे, त्यामुळे त्यांना आणखी तीन दिवस चौकशीला पुन्हा यावे लागेल, असे आज राज्य सरकारकडून एड दिपक ठाकरे यांनी सांगितले.
कंगना चौकशीला हजर होती. मात्र चौकशी अर्धवट सोडून निघून गेली, ती पोलिसांना सहकार्य करीत नाही असेही पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी सांगितले. मात्र ती दोन तास हजर होती. आणखी किती सहकार्य हवे, असा प्रश्न खंडपीठाने केला. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना समन्स बजावू नये असे खंडपीठाने स्पष्ट केले. तोपर्यंत इतर गुन्ह्यांचा तपास पोलिस करु शकतील, असाही शेरा खंडपीठाने मारला.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पोलिसांनी लावलेला राष्ट्रद्रोहाचा आरोपाबाबतही खुलासा हवा, असे आज पुन्हा खंडपीठ म्हणाले. पोलिसांनी भादंवि 124 (अ) नुसार देशद्रोहाचा आरोप कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेलवर ठेवला आहे.
संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कंगना याबाबत सोशल मीडियावर ट्विट करते, त्यामुळे तिला असे करायला मनाई करावी अशी मागणी ठाकरे आणि मूळ तक्रारदार साहिल अश्रफ अली सय्यद यांच्या वतीने एड रिझवान मर्चंट यांनी केली. याबाबत पुढील सुनावणीमध्ये बाजू ऐकू असे खंडपीठाने स्पष्ट केले.
हेही वाचा- खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत वाढ,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत अनेक वादग्रस्त आणि द्वेषपूर्ण ट्विट केले आहेत. यामुळे सामाजिक सलोखा आणि धार्मिकता बाधित झाली आहे अशी तक्रार सय्यद यांनी केली आहे.
----------------------
(संपादन- पूजा विचारे)
Sedition case Bombay High Court extended interim relief Kangana Ranaut Rangoli Chandel