बोंबील १०० रुपयांनी स्वस्त

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

मासेमारीबंदीचा कालावधी संपल्‍याने मत्‍स्‍यप्रेमींना मेजवानी

पनवेल : दरवर्षी श्रावणात बोंबलाची आवक मोठ्या प्रमाणात होते; मात्र या वर्षी पावसाची नियमितता, पूर, समुद्रातील वादळ आदी विविध कारणांमुळे त्यांची आवक घटल्याने चढ्या दराने विक्री सुरू होती. मागील आठवड्यात तर त्यांची ३०० ते ४०० रुपये किलोने विक्री करण्यात येत होती. आता आवक वाढल्याने त्यांचा भाव प्रति किलो २०० रुपये आहे. त्यामुळे खवय्यांना अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.

दर वर्षी पावसाळ्यात १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत खाेल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येते. त्यामुळे या दोन महिन्यांत मासळीचे भाव दुपटीने  वाढतात. मासेमारीवरील बंदीचा कालावधी नुकताच संपला आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. 

दोन दिवसांपासून बाजारात ताजे व स्वस्त मासे दाखल होऊ लागले असल्यामुळे काही दिवसांपूर्वी वाढलेले माशांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आले आहेत. १४ तारखेच्या नारळी पोर्णिमेच्या सणानंतर मासेमारी सुरू झाल्यावर हे दर आणखी कमी होण्याची शक्‍यता असल्याची माहिती पनवेलमधील मासेविक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. 
गेल्या आठवड्यात बोंबलांचा भाव प्रतिकिलो तब्बल ३०० ते ४०० रुपये होता. आता आवक वाढल्याने त्यांचा भाव आता प्रति किलो २०० रुपये आहे. त्यामुळे खवय्यांची चंगल झाली आहे.  

पापलेट, सुरमईच्या दरातही घसरण 
बोंबलाप्रमाणे पापलेट, सुरमई; तसेच हलव्याच्या दरातही घट झाली असून ५०० ते ६०० रुपये किलोप्रमाणे त्यांची विक्री केली जात आहे. तसेच पनवेलच्या बाजारात मागील आठवड्यात ४०० ते ५०० रुपये किलोने विक्री करण्यात आली येत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombil Fish rate down