वाडा तालुक्यात शेतात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली

दिलीप पाटील
बुधवार, 25 एप्रिल 2018

बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे सावट पसरले असून या वस्तूची तपासणी करण्यासाठी बॉम्ब स्कॉडला बोलावण्यात आले आहे.

वाडा - तालुक्यातील देवळी या गावात राहाणारे महेंद्र शंकर पाटील यांच्या शेतात शेताच्या बांध बंदिस्तीचे काम सुरू असतांना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे सावट पसरले असून या वस्तूची तपासणी करण्यासाठी बॉम्ब स्कॉडला बोलावण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती महेंद्र पाटील यांनी तात्काळ वाडा पोलिस स्टेशन व तहसीलदार यांना दिल्याने पोलिस व नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी हे तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पहाणी केली आणि बॉम्ब स्कॉडला बोलाविण्यात आले आहे. 

याबाबत माहिती देतांना महेंद्र पाटील यांनी सांगितले कि, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश शासनाने देवळी व परिसरातील जवळपास तेरा गावे उठवून सैनिकी छावण्या उभारण्यात आल्या होत्या. त्यावेळी प्रात्यक्षिके म्हणून तोफांच्या फैरी झाडल्या जात होत्या व अशा बॉम्बचे स्फोट या परिसरात होत असत. युद्धानंतर पुन्हा वास्तव्यास आल्यानंतर अशा स्फोट झालेले बॉम्ब आढळत होते. परंतु ही बॉम्ब सदृश्य वस्तू अखंड असल्यामुळे तिचा स्फोट होऊ शकला नसल्याचे दिसत असल्याने तात्काळ वाडा पोलिस स्टेशन व तहसिलदार यांना कळविले.

दरम्यान बॉम्ब स्कॉड आल्यावर व सदर संशयीत वस्तूची पहाणी केल्यानंतर याबाबत अधिक खुलासा करण्यात येईल, असे नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Bombs were found in the field in Wada taluka